Headlines

पातूरच्या पाणीप्रश्नावरून भाजपचा एल्गार:10 ते 12 दिवसांआड पाणीपुरवठा; नगर परिषदेला निवेदन सादर‎




शहरातील अनियमित पाणीपुरवठा आणि नागरिकांना नळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या गढूळ पाण्याच्या समस्येविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत एल्गार पुकारला आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ढोणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘पाणी हक्क जनआक्रोश मोर्चा’च्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांआड पाणी मिळत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. त्यातच मिळणारे पाणी गढूळ असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर केवळ चर्चा न करता थेट प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन नगरपरिषद प्रशासनाला सादर करण्यात आले. नियमित, मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे या वेळी ठणकावून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मोर्णा धरणात सध्या सुमारे ६५ टक्के समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही पातूरकरांना पाण्यासाठी १०-१२ दिवस प्रतीक्षा का करावी लागत आहे, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित करत प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवले. पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करणे, गळती शोधून जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि गढूळ पाण्याचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. या जनआक्रोश मोर्चाला भाजपसह विकास योद्धा मंच व विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *