![]()
ठाण्यातील मानपाडा आणि मनोरमानगर परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासाला आता अत्यंत वेगवान आणि सनसनाटी वळण मिळाले आहे. शिंदे सेनेच्या माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेने तब्बल 9 तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांनी पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना आणि राजेंद्र शिंदे यांना समोरासमोर बसवून उलटतपासणी केली. या ‘फेस-टू-फेस’ चौकशीदरम्यान राजेंद्र शिंदे यांनी, “मी पूर्णेकरांच्या सर्व मारेकऱ्यांना आधीपासूनच ओळखतो,” अशी धक्कादायक कबुली दिल्याने या प्रकरणात आता राजकीय आणि गुन्हेगारी साटेलोटे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरी राजेंद्र शिंदे यांनी, “मारेकऱ्यांशी केवळ ओळखीचा संबंध असून हत्येच्या कटाशी माझा काहीही संबंध नाही,” असा दावा केला असला, तरी त्यांच्या या कबुलीमुळे पूर्णेकर कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांना आता मोठा कायदेशीर व तपासात्मक आधार मिळाला आहे. तब्बल 9 तास कसून चौकशी; मारेकऱ्यांना समोरासमोर बसवले! ठाणे गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. पूर्णेकर यांच्या मुलाने केलेल्या जाहीर आरोपांनंतर पोलिसांनी तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या प्रमुख आरोपींना आणि राजेंद्र शिंदे यांना एकाच खोलीत समोरासमोर बसवले. आरोपींची विधाने, कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बैठकांबाबत शिंदेंवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. कामासाठी यायचे, पत्नी नगरसेविका असल्याने भेटीगाठी चौकशीदरम्यान राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांना सांगितले, “अटकेत असलेले पाचही संशयित आरोपी माझ्या ओळखीचे आहेत. ते माझ्याकडे कामाच्या शोधात यायचे. माझी पत्नी त्या प्रभागाची लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नगरसेविका असल्याने परिसरात अनेक कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भेटीगाठी होत असतात. त्या ओळखीपलीकडे माझा त्यांच्याशी कोणताही व्यवहार नाही आणि पूर्णेकरांच्या हत्येत माझा काडीमात्र सहभाग नाही.” ‘निळकंठ’ इमारतीबाहेरील बैठकीचा आरोप प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी हत्येच्या पहिल्या दिवसापासून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा उघड आरोप केला होता. “माझ्या वडिलांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस आधी मी स्वतः आरोपींना राजेंद्र शिंदे राहत असलेल्या ‘निळकंठ’ इमारतीबाहेर पाहिले होते. याच इमारतीत मारेकऱ्यांसोबत संशयास्पद बैठका झाल्या आणि माझ्या वडिलांच्या हत्येची पूर्ण योजना आखण्यात आली,” असा थेट आरोप राम पूर्णेकर यांनी केला होता. राजेंद्र शिंदे यांनी मारेकऱ्यांशी पूर्वपरिचय असल्याची कबुली दिल्यानंतर, राम पूर्णेकर यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असून, गुन्हे शाखा आता त्या दिशेने पुरावे गोळा करत आहे. कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या अन् चॉपरने सपासप वार 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील मनोरमानगर येथील कार्यालयात बसलेले असताना प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पाच मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. कार्यालयात अचानक घुसून हल्लेखोरांनी पूर्णेकरांवर थेट गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांची जागेवरच निर्घृण हत्या केली होती. ठाणे गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत सुभाष उर्फ पप्या शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू, निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या या पाच मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप; पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने या प्रकरणात सुरुवातीपासूनच राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत सीबीआय (CBI) किंवा सीआयडी (CID) चौकशीची मागणी लावून धरली होती. तसेच, मीनाक्षी शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला होता. आता प्रत्यक्ष राजेंद्र शिंदे यांनीच मारेकऱ्यांना ओळखत असल्याची कबुली दिल्याने, केवळ कामाच्या ओळखीचा हा दावा कितपत खरा आहे की त्यामागे पूर्णेकरांचा राजकीय व वैयक्तिक काटा काढण्याची सुपारी होती, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान ठाणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे. गुन्हे शाखा आता राजेंद्र शिंदे आणि आरोपींमधील आर्थिक देवाणघेवाण, सीडीआर (CDR) आणि संशयास्पद हालचालींची कसून तपासणी करत आहे. —————————————– हेही वाचा… MPSC आयोगाला रोहित पवारांचा थेट इशारा: म्हणाले- तुकाराम मुंढेंच्या धाकाचा परिणाम आहे का? जुनी कागदपत्रे नष्ट करण्यास विरोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत सलग अकरा दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आयोगाला पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘आंदोलन स्थगित केले म्हणजे प्रकरण संपले, अशा भ्रमात कुणीही राहू नये,’ असे सुनावत त्यांनी आयोगाच्या जुनी कागदपत्रे नष्ट करण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
होय, पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण हत्येत माझा हात नाही!:माजी महापौर मीनाक्षी शिंदेंच्या पतीची गुन्हे शाखेकडे मोठी कबुली, 9 तास चौकशी