![]()
दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावर आणि विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या सद्यस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. सत्तेबाहेर फेकले गेल्याने विरोधक पिसाळले असून, देशात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ‘एकमेकांविरुद्ध लढलो तरी विजय महायुतीचाच’ विधान परिषद निवडणुकीत एका जागेवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप असा सामना रंगत असून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “आमच्या चार जागांवर महायुती आधीच निश्चित झाली होती. एका जागेवर चर्चेमध्ये थोडा कमी-जास्तपणा झाला. मात्र, तिथे जरी आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो, तरी अंतिम विजय महायुतीचाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘देशात निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न’ दिल्लीत सुरू असलेल्या ‘तिरंगा रॅली’ आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनावर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, “हे लोक फक्त सत्तेच्या बाहेर असल्यामुळे पिसाळलेले आहेत. समाजात निगेटिव्हिटी तयार करून पुन्हा सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी त्यांनी कधी ईव्हीएम मशीन खराब असल्याचे सांगितले, तर कधी मतदार याद्यांवर आक्षेप घेतला. आता ते निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.” संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिशाभूल विरोधी पक्ष जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणाले, “हे लोक अनुसूचित जातींना (SC) संविधान बदलणार असल्याचे खोटे सांगतात. आदिवासी आणि ओबीसी (OBC) समाजाला त्यांचे आरक्षण धोक्यात असल्याची भीती दाखवतात. जातीयवादी शक्ती देशात अराजकता निर्माण करण्याचे काम करत असून, हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधात जाण्याचा हा प्रयत्न आहे,” असेही ते म्हणाले. बावनकुळे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. —————— हेही वाचा.. राज्यात फटाक्यांवर वर्षभर बंदी, मात्र विक्री-निर्मितीला निर्बंध नाहीत:दिवाळी-ख्रिसमसलाही फोडता येणार नाहीत; बॉम्बे हायकोर्ट म्हणाले- प्रदूषणामुळे शहर गॅस चेंबर बनू शकतात
बॉम्बे उच्च न्यायालयाने गुरुवारी सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि फुटपाथांवर फटाके फोडण्यावरील बंदी संपूर्ण वर्षभर लागू केली. ही बंदी नवरात्रोत्सव, दिवाळी, ख्रिसमस आणि इतर सर्व सणांवर लागू असेल. महाराष्ट्रभर सणांच्या मिरवणुकांदरम्यान होणारा ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला के. गोकले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. सविस्तर वाचा
Source link
विरोधकांचा हिंदुत्वविरोधी अजेंडा:आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजांत तेढ निर्माण करण्याचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे