![]()
औषधी वनस्पतींचे गुणधर्म, आयुर्वेदाचे महत्त्व, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात ील संकल्पना विद्यार्थ्यांनी मॉडेल्सच्या माध्यमातून उलगडल्या. डाळिंब, कोरफड, हर्बल इम्युनिटी बूस्टरपासून सौरमाला, डीएनए, चांद्रयानापर्यंत विविध विषयांनी एस. के. वंजारी स्मृती आंतरशालेय प्रदर्शनात लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणाऱ्या या प्रदर्शनात २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १३० मॉडेल्स सादर करण्यात आली. आरोग्यविषयक माहितीपासून अवकाश संशोधनापर्यंतचे विषय असल्याने विद्यार्थ्यांना आपले ज्ञान, सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळाली. मिल्लत सोशल वेल्फेअर असोसिएशन, शेंदूरजनाघाटद्वारे संचालित स्व. पंजाबराव ठाकरे उर्दू मिडल स्कूल येथे एच. के. एम. उर्दू हायस्कूल, वरुड, स्व. पंजाबराव ठाकरे उर्दू मिडल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मिल्लत सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल शकील, रंजना वंजारी, मौलवी मतीन यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी नईम शेख जरुडकर, प्रदर्शनाचे प्रभारी सय्यद सादिक, एहराज फैसल, शेख मुनझीम उपस्थित होते. प्रदर्शनात औषधी वनस्पती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान असे दोन विभाग होते. आठ गटांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील मॉडेल्स सादर केली. औषधी वनस्पती विभागात डाळिंबाचे उपयोग, केळीचे फायदे, कोरफडीचे गुणधर्म, दैनंदिन जीवनातील आयुर्वेदाचे महत्त्व, त्वचेची निगा, तंबाखूचे दुष्परिणाम, विविध आजारांविषयी माहिती मांडण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात सौरमाला, वॉटर इंडिकेटर, दुर्बीण, उपग्रह, स्वयंचलित पावसाचा इशारा देणारी यंत्रणा, आपत्ती सूचना यंत्रणा, वॉटर फिल्टर, चांद्रयान, डीएनए यांसारख्या विषयांचा समावेश होता. प्राध्यापक, डॉक्टर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांनी मॉडेल्सचे परीक्षण केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले. पीपल्स चॉइस पुरस्कारासाठीही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीक्षक व्ही. आर. देशमुख, डॉ. प्रदीप भगत, मो. युनूस शेख, जगदीश वानखडे यांचा अब्दुल शकील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नईम शेख जरुडकर यांनी प्रास्ताविकातून प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट केली. नईम अहमद, एहराज फैसल यांनी सूत्रसंचालन केले. सय्यद सादिक यांनी आभार मानले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दैनंदिन जीवनात वनस्पतींचे असलेले महत्त्व औषधी वनस्पती विभागातून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वनस्पतींचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. डाळिंबाचे उपयोग, केळीचे फायदे, कोरफडीचे गुणधर्म यांसारख्या विषयांद्वारे वनस्पतींचे विविध उपयोग मांडण्यात आले. आयुर्वेदाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, हर्बल इम्युनिटी बूस्टर, त्वचेची निगा यांसारख्या विषयांतून आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तंबाखूच्या दुष्परिणामांसह विविध आजारांबाबतही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. परिचित वनस्पती, आरोग्याशी संबंधित विषयांची निवड केल्याने या विभागातून विद्यार्थ्यांना माहिती संकलन, विषय समजून घेणे, ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव मिळाला.
Source link
औषधी वनस्पतींपासून चांद्रयानपर्यंत:प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कल्पक भरारी, एस. के. वंजारी स्मृती आंतरशालेय प्रदर्शनात 260 विद्यार्थ्यांचा सहभाग