![]()
मैत्रीच्या नात्यात विश्वासघात करीत दोन मित्रांनीच तिसऱ्या मित्राची गावठी बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील पेढेवाडी शिवारात उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भोरू सोमा कातोरे (वय ३२, रा. दगडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी धोंडू सोमा पथवे (रा. दगडवाडी) आणि नवनाथ नारायण कुलाळ (रा. पेढेवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दगडवाडी आणि पेढेवाडी ही अकोले तालुक्यातील दुर्गम दुर्गम आदिवासी गावे आहेत. पोलीस तपासानुसार, भोरू आणि दोन्ही आरोपी मित्र होते. भोरू याचे आरोपींच्या जवळच्या नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. यावरून त्यांनी भोरूला समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणाची गावात चर्चा सुरू झाल्याने आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपी भोरूला विश्वासात घेऊन पेढेवाडीच्या घनदाट जंगलात घेऊन गेले. तेथे वाद झाल्यानंतर गावठी बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहावरपाला-पाचोळा टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, भोरूचे वाहन घटनास्थळीच राहिल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. भोरू दोन दिवस घरी न परतल्याने त्याचा भाऊ मनाजी सोमा कातोरे यांनी अकोले पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला असता घटनास्थळी बेवारस वाहन आढळले. प्रत्यक्षदर्शींनी भोरूला आरोपींसोबत पाहिल्याची माहिती दिली. वाहन आणि शवविच्छेदन अहवालासह अन्य तपासातून खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
Source link
मैत्रीच्या विश्वासाचा घात:जंगलात नेऊन मित्राची गोळ्या झाडून हत्या