![]()
नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात भोऱ्याबाबा दादासाहेब अहिरे (वय ५०, मूळ रा. तिळापूर, ता. राहुरी) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. १५ ऑक्टोबरच्या रात्री काशिनाथ जनार्दन आवटी यांच्या वस्तीबाहेर झोपलेले असताना अहिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दोन दिवसांनंतर शोध घेतला असता, उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. अहिरे हे अनेक वर्षांपासून गोधेगाव परिसरात राहत होते. त्यांचे जवळचे नातेवाईक परिसरात नसल्याने ते बेपत्ता झाल्याचे सुरुवातीला कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, दोन दिवस ते दिसून न आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. शोधादरम्यान उसाच्या शेताच्या कडेला त्यांची चप्पल आढळली. त्यानंतर उंच उसात आतल्या बाजूला त्यांचे पाय दिसून आले. अधिक पाहणी केली असता, शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख भोऱ्याबाबा अहिरे अशी पटली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे, उपनिरीक्षक विकास पाटील, घटनास्थळी भेट दिली. वनविभागाचे अधिकारी अविनाश तेलोरे, महसूल मंडळ अधिकारी अनिल गव्हाणे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचे भाऊ गबाजी दादासाहेब अहिरे (रा. तिळापूर, ता. राहुरी) यांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, आ. विठ्ठलराव लंघे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. शेतकरी,मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गोधेगाव परिसरात यापूर्वी बिबट्याने शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता शेतमजुराचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Source link
गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू:2 दिवसांनंतर उसाच्या शेतात आढळला मृतदेह; आ.लंघेंची घटनास्थळी भेट