.

यंदा सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके तर वाय गेलीच. मात्र पिण्याच्या पाण्याचीही अडचण झाली आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात १३९ गावे आणि ७५२ वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ६२,४४९ नागरिकांसह ९५,९३२ पशुधनाची तहान भागवण्यासाठी तब्बल १३५ टँकर सुरू आहेत. माळशिरस तालुक्यातील सीमावर्ती डोंगराळ भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सिंचन प्रकल्पामध्ये भेगा पडलेले चित्र दिसतेय. तर कूपनलिकांना पाणी येत नाही. लोकांना पाण्यासाठी कामे सोडून टँकरची वाट पाहात थांबावे लागत आहे.
पाऊस नसल्याने यंदा दुष्काळी झळा वाढत असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी टँकर सुरू आहेत. याशिवाय पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्ह्यातील ४० विहिरी आणि २१ बोअरवेल असे एकूण ६१ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी ही माहिती दिली. पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला. बोअरही दहा मिनिटांतच उचक्या देऊ लागले आहे. एका कुटुंबाला पुरेल इतकेही पाणी त्यातून येईना. गारवाड आणि परिसरातील गावांमध्ये लोक टँकरची वाट पाहात थांबतात.
डोंगराळ भागात टँकरची वाट पाहतात
चाराटंचाईमुळे आता वैरणीचे दरही वाढले सध्या साखर कारखाने सुरू झाले असल्याने वैरणीसाठी उसाच्या वाड्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.मात्र ऊसतोड कामगारांनी त्याचेही दर वाढवले आहेत. सध्या १० काड्याची साधारण पेंडी ५ रुपयांना विकली जात आहे. साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी शेतकरी आपल्या जनावरांना शेतातील उसाचा चारा देत आहेत.