Headlines

संतप्त तरुणाने विचारला आमदार चव्हाणांना जाब:पदवीधर निवडणूक प्रचारात वैजापुरात खळबळ‎




पदवीधरांचे प्रश्न ऐकण्यासाठी संवादाचा मंच सजला खरा; मात्र त्याच मंचावर आमदार सतीश चव्हाण यांना थेट जाब विचारण्यात आल्याने रविवारी (१८ ऑक्टोबर) वैजापुरातील राजकीय वातावरण तापले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी कुठे होता? विद्यार्थ्यांसाठी जंतरमंतरवर का गेला नाहीत? भरती प्रक्रियेतील कथित आर्थिक देवाणघेवाणीबाबत तुमची भूमिका काय? अशा प्रश्नांची सरबत्ती अजय पाटील साळुंके यांनी भरसभेत केली. प्रश्नांचा भडिमार सुरू असतानाच स्थानिक कार्यकर्त्यांनी साळुंके यांना धरून सभास्थळाबाहेर नेल्याने एकच गोंधळ उडाला. पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आयोजित बैठकीत प्रश्न विचारणाऱ्यालाच बाहेर काढण्याची वेळ आल्याने हा संवाद होता की केवळ प्रचाराचा देखावा, असा सवाल उपस्थित झाला आहे. शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आमदार चव्हाण यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर प्रश्नोत्तरांचा प्रसंग सुरू झाला. या वेळी अजय पाटील साळुंके यांनी स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांना हात घातला. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आपण नेमके कुठे होता, असा थेट सवाल त्यांनी केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी जंतरमंतरवर का गेला नाहीत, अशी विचारणा केली. उपस्थितांसमोर सुरू असलेल्या या प्रश्नांच्या फैरीदरम्यान काही स्थानिक कार्यकर्त्यांनी साळुंके यांना धरून बाहेर नेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *