Headlines

आरोपींचे आका कुठेही लपलेले असोत, त्यांना शोधून काढू:टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गँगस्टर्सना इशारा




जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची माहिती दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींची ओळख पटवली असून, हे भ्याड हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड (आका) जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले, तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. रातोरात आरोपींची ओळख पटली देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे लागले असून रातोरात मुख्य आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. लवकरच या आरोपींना बेड्या ठोकल्या जातील. हे लोक महाराष्ट्राबाहेरून किंवा देशाबाहेरून सूत्रे हलवत आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून आणि केंद्र सरकारची मदत घेऊन या सर्वांचा पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरण विसरलात का?’ टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला. “विरोधकांनी टीका करण्यापूर्वी थोडे अंतर्मुख होऊन स्वतःच्या काळाकडे पाहावे. हे तेच लोक आहेत ज्यांच्या काळात पोलिसांच्या मदतीने देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता. मनसुख हिरेन यांची हत्या आणि सीबीआयने उघडकीस आणलेले बदल्यांमधील घोटाळे ते कदाचित विसरले असावेत,” असा घणाघाती पलटवार त्यांनी केला. मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक (Professional) असून ते या प्रकरणाच्या मुळाशी नक्की जातील, असेही ते म्हणाले. लॉरेन्स बिश्नोई गँगला थेट इशारा या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याच्या चर्चेवरही फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “कोणतीही गँग असो किंवा व्यक्ती, कोणालाही सोडले जाणार नाही. धमक्या देऊन जर कोणी असे काम करत असेल, तर त्यांना कसे सरळ करायचे हे मुंबई पोलिसांना चांगलेच माहिती आहे. बॉलीवूडच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेणार टायगर श्रॉफ आणि यापूर्वी सलमान खानला आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूडच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या घटनेशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे बारकाईने विश्लेषण केले जाईल. ज्या ज्या सेलिब्रिटींना सुरक्षेची गरज आहे, त्याचा आढावा घेऊन मुंबई पोलीस आवश्यक ती सर्व खबरदारी घेतील. ————— ही बातमी पण वाचा.. टायगर श्रॉफवर गोळीबार, हातावर-छातीवर पट्ट्या: एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले मुंबईच्या जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफचे फोटो समोर आले आहेत. त्याच्या हातावर आणि छातीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरा त्याच्या घरी भेट दिली. त्यांनी सांगितले की, बंदुकीच्या दारूगोळ्यामुळे आणि काचेच्या तुकड्यांमुळे टायगरच्या हाताला दुखापत झाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *