![]()
“अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना धमकावत असून ‘काँग्रेसला मतदान केले नाही तर नोकरीवरून काढून टाकू’, अशी उघड गुंडगिरी करत आहेत. सरकारी अनुदानावर चालणाऱ्या आणि शासनाकडून पगार घेणाऱ्या शाळांमध्ये ही मग्रुरी कदापि खपवून घेतली जाणार नाही. अशा संस्थाचालकांची रीतसर चौकशी करून त्यांचे शासकीय अनुदान कायमचे बंद केले जाईल. शिक्षकांनी कोणाच्याही दबावाला किंवा धमकीला घाबरण्याची गरज नाही, सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे,” असा थेट आणि सज्जड दम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या एकेरी टीकेचा समाचार, तसेच राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पीय खर्चात घेतलेल्या कपातीच्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांना धमकावल्यास गय नाही! शिक्षण संस्थांमधील राजकीय हस्तक्षेपावर तीव्र संताप व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले, “अमरावती दौऱ्यावर असताना अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष भेटून संस्थाचालकांकडून धमक्या येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काँग्रेसला मत देण्यासाठी दबाव आणला जात आहे. मी सुरुवातीला कोणत्याही विशिष्ट संस्थेचे नाव घेतले नव्हते; मात्र तरीही काँग्रेसचे नेते आणि आमदार अंगावर का घेत आहेत?” शिवाजी शिक्षण संस्थेबद्दल आदर “श्री शिवाजी शिक्षण संस्था ही विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे भूषण आहे. भारतरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी या संस्थेचे रोपटे लावले आणि आज त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. मी स्वतः या संस्थेचा माजी विद्यार्थी असून कोराडीतील शाळा आम्ही मजबूत केली आहे. संस्थेबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे; मात्र त्या खुर्चीवर बसून जर काही राजकीय लोक संस्थेचा गैरवापर करत असतील आणि शिक्षकांना नोकरीवरून काढण्याची भाषा करत असतील, तर ती बदमाशी अजिबात चालू दिली जाणार नाही. या प्रकरणाची 100% चौकशी केली जाईल. शिक्षकांनी कोणत्याही धमकीला बळी न पडता गुप्त आणि पारदर्शक पद्धतीने स्वतःच्या मर्जीने मतदान करावे. एकाही शिक्षकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.” फडणवीसांवर बोलताना राऊतांनी आधी स्वतःची लायकी अन् आकार बघावा! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या एकेरी आणि आक्षेपार्ह टीकेचा बावनकुळे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “संजय राऊत आणि जामिनावर सुटलेले सुनील केदार हे सातत्याने मुख्यमंत्र्यांबद्दल अशोभनीय भाषा वापरत आहेत. याबाबत आम्ही नागपूर ग्रामीण पोलिसांकडे (SP) अधिकृत तक्रार केली आहे. संजय राऊतांना माझी स्पष्ट सूचना आणि विनंती आहे की, त्यांनी कोणावरही बोलण्यापूर्वी स्वतःचा आकार आणि राजकीय वजन तपासावे.” फडणवीसांचे नेतृत्व सिद्ध झालेले “देवेंद्र फडणवीस हे देशातील पहिल्या 10 आणि पहिल्या 5 प्रभावी मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. 288 पैकी तब्बल 237 आमदारांचे प्रचंड पाठबळ असलेले फडणवीस हे राज्यातील सर्वात ताकदवान नेते आहेत. त्यांना राऊतांच्या प्रमाणपत्राची गरज नसून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जनमताचे प्रमाणपत्र दिले आहे.” नागपुरात सुधाकर कोहळे 50,000 मताधिक्याने जिंकणार विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे. 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात 11 मंत्र्यांनी नागपुरात ठाण मांडून सत्तेचा गैरवापर केला आणि संदीप जोशींचा पराभव केला होता. मात्र, यावेळी पदवीधरांचा महायुतीवर पूर्ण विश्वास आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे हे तब्बल 50,000 हून अधिक मताधिक्याने विजयी होतील. आगामी 6 वर्षे ते पदवीधरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडवतील.” बंडखोरांवर कारवाईची मागणी “भाजपने आपल्या सर्व बंडखोरांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्याविरोधात ज्यांनी भूमिका घेतली, त्यांच्यावरही शिवसेनेने (शिंदे गट) कडक कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे.” दुष्काळात विकासकामे 1 वर्ष लांबणीवर पडली तरी चालतील, पण शेतकरी जगला पाहिजे! राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना महसूलमंत्र्यांनी शासकीय खर्चातील कपातीचा महत्त्वपूर्ण खुलासा केला. “माझ्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट उपसमितीने दुष्काळ निवारणासाठी सरकारी खर्चात कपात करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या विकास निधीत 20% पर्यंत कपात करण्याचे आदेश दिले आहेत. डीपीसी (DPC) मधील अनावश्यक सिमेंट रस्ते आणि इतर बांधकामे या वर्षी पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत.” सर्व प्राधान्य दुष्काळ निवारणाला “एखादा रस्ता 1 वर्ष उशिरा झाला तरी चालेल, मात्र दुष्काळात शेतकऱ्यांची आत्महत्या होता कामा नये. 11 ते 12 विभाग दुष्काळ निवारणात कार्यरत असून चारा छावण्या, टँकर्स, विहिरींचे पुनरुज्जीवन, शेततळी आणि जलसंधारणासाठी तिजोरी खुली ठेवण्यात आली आहे. नागपुरात 1,400 कोटींच्या डीपीसी निधीतून सर्व अनावश्यक कामे थांबवून केवळ पाणीटंचाई आणि शेती रस्त्यांवर भर दिला जात आहे.” ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या राहुल गांधींना जनतेनेच नाकारले! काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांची खिल्ली उडवताना बावनकुळे म्हणाले, “भारतातील निवडणूक आयोग हा जगातील सर्वात पारदर्शक आहे. याच यंत्रणेद्वारे नागपुरात नितीन गडकरी जिंकतात आणि त्याच वेळी शेजारच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे निवडून येतात. काँग्रेस जिंकली की लोकशाही आणि भाजप जिंकली की ईव्हीएम चोरी, हा मूर्खपणा आहे.” 2029 मध्येही जनता धडा शिकवेल “जनतेने चोरांना मते देणे बंद केले आहे. 2024 च्या पराभवानंतर आता 2029 च्या निवडणुकीत काँग्रेसला त्याहूनही कमी मते मिळतील आणि जनता त्यांना कायमचा धडा शिकवेल,” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी व्यक्त केला. ——————————————————— हेही वाचा… टायगर श्रॉफवरील गोळीबारातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते: राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकावरच पकडले, एक बिहारचा तर दोघे हरियाणाचे मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थान पोलिसांनी सोमवारी सकाळी १०:३० वाजता कोटा येथे तीन संशयितांना अटक केली. सर्व आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसने जयपूरला जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर बसने दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याची त्यांची योजना होती, परंतु पोलिसांनी त्यांना कोटा रेल्वे स्टेशनवर पकडले. कोटाच्या पोलीस अधीक्षक, तेजस्विनी गौतम म्हणाल्या, “मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर, कोटा पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत ट्रेनची झडती घेतली आणि तिघांना पकडले.” येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शिक्षकांना धमकावले तर अनुदान बंद करू, गय करणार नाही!:महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा, म्हणाले- फडणवीसांवर बोलताना राऊतांनी आधी स्वतःचा आकार बघावा!