![]()
पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय पुणेकरांना उपलब्ध झाला आहे. ग्रीन टायगर मोबिलिटीने इव्हॉल्टिक्स ग्रीन मोबिलिटीच्या सहकार्याने धनकवडी येथे ईव्ही रेट्रोफिटिंग केंद्र सुरू केले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या केंद्रामध्ये निवडक पेट्रोल दुचाकींचे पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल आणि वीज अशा दोन्ही ऊर्जांवर चालणाऱ्या संकरित वाहनांमध्ये रूपांतर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन दुचाकी खरेदी करण्याऐवजी सध्याच्या वाहनाचा वापर कायम ठेवत इलेक्ट्रिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारता येईल. मात्र, रूपांतरणाची सुविधा संबंधित वाहनाची तांत्रिक सुसंगतता आणि आवश्यक नियामक मंजुरींवर अवलंबून असेल. ग्रीन टायगर मोबिलिटीने स्वदेशी आणि पेटंटप्राप्त रूपांतरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. बंगळुरू, नागपूर, बेळगावी, कोल्हापूर आणि हैदराबाद येथे आतापर्यंत १,५०० हून अधिक ग्राहकांना सेवा देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. वाहनधारकांना कोणत्या सुविधा मिळणार नव्या केंद्रात वाहनाची तांत्रिक तपासणी, रूपांतरणाचे उपलब्ध पर्याय आणि प्रक्रियेची माहिती मिळेल. कंपनीच्या सेवांमध्ये वाहन रूपांतरणासोबतच वाहन संशोधन संघटनेच्या (एआरएआय) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नियमांनुसार मंजुरी, वित्तपुरवठा, विमा आणि रस्त्यावरील आपत्कालीन मदतीचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. ग्रीन टायगर मोबिलिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष डोकानिया यांनी या तंत्रज्ञानामुळे जुन्या वाहनांचे उपयुक्त आयुष्य वाढविण्यास आणि स्थानिक उद्योजकांना संधी मिळण्यास मदत होईल, असे सांगितले. इव्हॉल्टिक्स ग्रीन मोबिलिटीचे मालक विकास पाचकळे यांनीही इलेक्ट्रिक वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
Source link
पुण्यात पेट्रोल दुचाकींचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणारे केंद्र सुरू:नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन, मुरलीकांत पेटकर उपस्थित