Headlines

नंदा बराटे यांना हिंदू महिला सभेतर्फे दुर्गा पुरस्कार प्रदान:गरजू मुलांच्या संगोपनासाठी सन्मान, 200 मुलांना पुस्तके, 25 मुलींचे कुमारिका पूजन




गरजू, निराधार आणि वंचित मुलांच्या संगोपनासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या नंदादीप फाउंडेशनच्या प्रमुख नंदा बराटे यांना हिंदू महिला सभेतर्फे देण्यात येणारा दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्टिस्ट्री संस्थेच्या संस्थापिका वीणा गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्टिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा वीणा गोखले आणि हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले उपस्थित होत्या. हिंदू महिला सभेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने कुमारिका पूजन केले जाते. यंदा या उपक्रमांतर्गत नंदादीप फाउंडेशनच्या २०० मुलांना पुस्तके भेट देण्यात आली, तर २५ मुलींचे पारंपरिक पद्धतीने कुमारिका पूजन करण्यात आले. आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली, याविषयी सांगताना नंदा बराटे म्हणाल्या, “भावाच्या निवडणुकीच्या वेळी मी झोपडपट्टीमध्ये मत मागण्यासाठी फिरत होते. त्यावेळी एका घराबाहेर एक चिमुकला मुलगा रडत होता. त्याची आई त्याला घरी सोडून कामावर गेली होती. घरात त्याच्यासाठी ठेवलेल्या पोळी-भाजीच्या ताटात कुत्र्याने तोंड घातले होते. त्यामुळे मुलाच्या सुरक्षिततेची काळजी वाटली आणि आई घरी येईपर्यंत त्याची जबाबदारी घेण्याच्या भावनेतून मी त्याला घरी आणले. त्याची आई घरी आल्यानंतर तिला याबद्दल जाब विचारला. तेव्हा तिचा नवरा दारू पितो आणि ती ज्या सोसायटीत काम करते, तिथे मुलांना घेऊन जाण्याची परवानगी नाही, असे तिने सांगितले. या प्रसंगाने माझ्यातील सामाजिक भान जागे झाले. त्या एका मुलाबरोबरच कामावर जाणाऱ्या इतर महिलांच्या मुलांचीही जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गरजू, निराधार आणि वंचित मुलांसाठी काम करण्याची बांधीलकी सुरू झाली.” नंदादीप फाउंडेशनच्या माध्यमातून बराटे अनेक वर्षांपासून बालवाडी आणि पाळणाघर चालवून मुलांच्या संगोपनाचे काम करत आहेत. लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. पाळणाघरातील मोठ्या गटात शिकणारा एक मुलगा पेन्सिल तोंडात धरून सिगारेट ओढण्याची नक्कल करत असल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला. त्याला याबद्दल विचारले असता, वडील असे करतात आणि धुराची जादू दाखवतात, असे त्याने सांगितले. त्यानंतर बराटे यांनी त्या मुलाच्या वडिलांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. हा प्रसंग ऐकून वडील सुन्न झाले आणि त्यांनी सिगारेट ओढणे कायमचे बंद केले, अशी आठवण त्यांनी सांगितली. मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणेही गरजेचे असते, असे बराटे यांनी नमूद केले. कौटुंबिक तणावामुळे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करणाऱ्या एका आईचे समुपदेशन केल्यानंतर तिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि तिने पुन्हा असा विचार न करण्याचा निश्चय केला. अशा अनेक प्रसंगांत पालकांना समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करावे लागते, असे त्या म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *