![]()
पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ७ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खासगी बँकेकडून निवृत्ती वेतन योजना सुरू होणार असल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाणेरमधील पॅनकार्ड रस्त्यावर राहणाऱ्या ७६ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला खासगी बँकेचे अधिकारी असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरू होणार असल्याचे सांगून, त्याचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचा तपशील मागवला. तपशील मिळाल्यानंतर चोरट्यांनी महिलेचा मोबाइल नंबर हॅक केला आणि बँक खात्यातून ७ लाख ४९ हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. टपाल कार्यालयातील पाठीमागील बाजूचा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरी उचकटण्याचा प्रयत्न केला. याबाबत रास्ता पेठेतील टपाल कार्यालयातील अधिकारी सानिका सुबोध जोशी (वय ५५) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. रास्ता पेठेतील सरदार रास्ते यांचा पेशवेकालीन वाडा आहे. या वाड्यात तळमजल्यावर टपाल कार्यालय आहेत. शनिवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी टपाल कार्यालय बंद करण्यात आले. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी टपाल कार्यालयातील पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी जाळी उचकटली. कार्यालयातील तिजोरी उचकटण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (१९ ऑक्टोबर) टपाल कार्यालयातील पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी टपाल कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार अमोल गावडे तपास करत आहेत.
Source link
निवृत्ती वेतन योजनेचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची 7.49 लाखांची फसवणूक:बाणेर पोलिसांत सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल