Headlines

Sachin Ahir Slams Manoj Jarange Patil Over 500 Crore Allegation; Mumbai


“मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत की स्वतःचा वैयक्तिक राजकीय अजेंडा पुढे रेटत आहेत, हेच आता समजण्यापलीकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते जरांगेंना दिले, हा त्यांनी दसरा म

.

बीडच्या श्री क्षेत्र नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित देवाणघेवाणीवरून केलेल्या स्फोटक विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या दसरा संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

एवढे दिवस गप्प का बसलात?; 500 कोटींचा आरोप म्हणजे राजकीय स्टंटबाजी!

जरांगे यांनी केलेल्या आर्थिक आरोपांची खिल्ली उडवत सचिन अहिर म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वीची कथित माहिती होती, तर जरांगे इतके दिवस शांत का बसले होते? दसरा मेळाव्याच्याच दिवशी असा कोणताही आधार नसलेला आकडा फेकून सनसनाटी निर्माण करण्याचे कारण काय? हा निव्वळ राजकीय स्टंट आहे.”

शिंदेंनी समाजाला भरभरून दिले

“मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत निघालेला मोर्चा मुंबईत येऊ नये आणि सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आंदोलकांच्या दारात गेले होते, असा इतिहास महाराष्ट्रात कधी घडला नव्हता. उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ वारंवार चर्चेसाठी गेले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जे काही हक्काचे दिले, ते संपूर्ण समाज जाणून आहे. असे असताना केवळ स्वतःचे राजकीय महत्त्व टिकवण्यासाठी शिंदे साहेबांवर असे बिनबुडाचे आरोप करणे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.”

बोलवते धनी कोणी दुसरेच; विरोधकांच्या इशाऱ्यावर जरांगेंची भाषा!

जरांगे यांच्या भाषणामागील राजकीय सूत्रधारांकडे बोट दाखवताना अहिर म्हणाले, “जरांगे यांच्या मागे नक्की कोणती राजकीय शक्ती उभी आहे आणि त्यांना कोणाकडून रसद पुरवली जात आहे, हे आता जनतेला समजू लागले आहे. सामान्य जनता किंवा मराठा समाज काही मूर्ख नाही. आंदोलन संपल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे आरोप केले जात आहेत.”

दसऱ्याला उत्तरे देण्याची गरज नाही

“जरांगे म्हणतात की दसऱ्याच्या सभेत एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे; मात्र आमच्या दसरा मेळाव्यात अशा तथ्यहीन आरोपांवर वेळ वाया घालवण्याची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही. आमचा दसरा मेळावा हा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.”

शिवसेनेचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित!

शिवसेनेच्या दसरा संमेलनाच्या स्वरूपावर बोलताना सचिन अहिर यांनी सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली. “पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यंदाचा दसरा मेळावा कोणताही मोठा गाजावाजा, फटाके किंवा शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने पार पडत आहे. केवळ देशभक्तीपर आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दुःखाशी समरस होण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.”

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार

“मी स्वतः नुकताच अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करून आलो. एका बाजूला भीषण दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात बळीराजा होरपळत आहे. त्यामुळे हा मेळावा संपताच शिवसेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवली जाईल आणि त्यांची दिवाळी गोड केली जाईल.”

‘रेझिम चेंज’ची स्वप्ने पाहणाऱ्यांना जनता जागा दाखवेल!

संजय राऊत यांनी अल्बानियातील सर्वोच्च न्यायालय जाळल्याच्या घटनेचा दाखला देत केंद्र व राज्य सरकारवर केलेल्या टीकेवरही त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “भारताची तुलना बांगलादेश, फ्रान्स किंवा अल्बानियासारख्या देशांशी करून रस्त्यावर उतरून ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) करण्याची भाषा विरोधक करत आहेत. ही अत्यंत विकृत आणि लोकशाहीविरोधी मानसिकता आहे. जेव्हा लोकसभेत निकाल अनुकूल येतो तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि विधानसभेत पराभव दिसू लागला की जनतेला भडकवायचे, हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे.”

मतपेटीतूनच उत्तर मिळणार

“विविध जाती, धर्म आणि भाषांचा हा देश एकात्मतेने बांधलेला आहे. रस्त्यावर जाळपोळ करून देशात अराजकता निर्माण करण्याचे मनसुबे महाराष्ट्रातील सुजाण नागरिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमातून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल.”

मुंबईतील संघटनात्मक नियुक्त्या दसऱ्यानंतर जाहीर होणार!

मुंबईतील शिवसेनेच्या रखडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत विचारले असता अहिर यांनी खुलासा केला. “खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नितेश राणे, मंत्री योगेश कदम, मिलिंद देवरा, खासदार राहुल शेवाळे आणि मी स्वतः एकत्र बसून मुंबईतील सर्व संघटनात्मक पदांवर सविस्तर चर्चा केली आहे. दसऱ्याच्या मेळाव्यापूर्वी कोणाचाही उत्साह कमी होऊ नये म्हणून या नियुक्त्या थांबवण्यात आल्या होत्या. आता सर्वांना विश्वासात घेऊन येत्या आठवडाभरात या सर्व पदांची अधिकृत घोषणा केली जाईल.”

————————————————————————–

हेही वाचा…

500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर षड्यंत्र उघडे पाडा: मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; हेक्टरी 1 लाख, संपूर्ण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही!

“मराठा समाजाने आता डोळे उघडून स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण्यांचे पक्ष आणि त्यांचे आमदार-खासदार वाढवण्यासाठी स्वतःचा बळी देणे आधी बंद करा. दुष्काळात शेतकरी हतबल झाला आहे, पिके जळून खाक झाली आहेत आणि सरकार अवघे 5,000 रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या 5,000 रुपयांसाठी शेतकऱ्याचे बँकेच्या फेऱ्या मारण्यात आणि प्रवासातच सर्व पैसे खर्च होणार; मग शेतकऱ्याच्या हातात काय उरणार? राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. यासाठी सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठा लढा उभारणार,” असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.