Headlines

पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 44 लाखांचा गांजा जप्त:सीमाशुल्क विभागाने कारवाई करत प्रवाशाला अटक केली; न्यायालयीन कोठडीत रवानगी




बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय प्रवाशाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा १.२६५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बॅगेच्या अस्तरामध्ये विशेष बनावट कप्पे तयार करून त्यात हा अमली पदार्थ लपवण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुणे सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि विमानतळ पथकाने ही कारवाई केली. संबंधित प्रवासी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘IX-241’ या विमानाने बँकॉकहून पुण्यात आला होता. प्रवाशाच्या हालचालींचे विश्लेषण आणि चेक-इन बॅगेच्या क्ष-किरण तपासणीदरम्यान संशय निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी रोखले. प्रवाशाच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेची सखोल तपासणी केली असता, वैयक्तिक वस्तूंच्या खाली बॅगेच्या बाजूंच्या अस्तरामध्ये दोन गुप्त कप्पे तयार केल्याचे आढळले. हे कप्पे उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये दोन आयताकृती, हवाबंद प्लास्टिक पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा वाळलेला वनस्पतीजन्य पदार्थ होता. प्राथमिक क्षेत्रीय चाचणीत तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायदा, १९८५ मधील तरतुदींनुसार एकूण १.२६५ किलो अमली पदार्थ जप्त केला. त्याचे अवैध बाजारातील मूल्य सुमारे ४४.२७ लाख रुपये असल्याचे विभागाने स्पष्ट केले. या तस्करीमागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. हा अमली पदार्थ कोणाकडून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कुठे केला जाणार होता आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे, याचा शोध सीमाशुल्क विभागाकडून घेतला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *