Headlines

सिन्नरला उदमांजराची पाच पिल्लांसह सुरक्षित सुटका:वन विभागाच्या पथकाने दोन तासांत केले रेस्क्यू‎




शहरातील बोडके मळा परिसरातील ‘मंगलमूर्ती फटाका गोदामात’ सोमवारी मादी उदमांजर पाच पिल्लांसह आढळून आली. गोदाममालक अतुल बोऱ्हाडे यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने दोन तासांत मादीसह पाचही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. फटाक्यांचा साठा असलेल्या गोदामात वन्यजीव आढळल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. गोदाममालक अतुल बोऱ्हाडे नेहमीप्रमाणे कामासाठी गोदामात गेले असता, त्यांना मादी उदमांजर आपल्या पाच लहान पिल्लांसह बसल्याचे निदर्शनास आले. गोदामात फटाक्यांचा मोठा साठा असल्याने धोका न पत्करता त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच सोमवारी (दि.१९) वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. उदमांजर चपळ असल्याने आणि तिच्यासोबत पिल्ले असल्याने बचाव पथकाने जाळी लावून मोहीम राबवली. अखेर दुपारी मादीसह पाचही पिल्लांना सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश आले. ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगाव वनपरिमंडळ अधिकारी प्रीतीश सरोदे, वनरक्षक संतोष चव्हाण आणि वन्यजीव बचाव पथकाचे निखिल वैद्य, रोहित लोणारे व शुभम टिंगरे यांनी यशस्वी केली. उदमांजर हा लाजाळू व निशाचर प्राणी असून, मानवाला कोणताही धोका पोहोचवत नाही. निवासी किंवा व्यावसायिक भागात वन्यजीव आढळल्यास घाबरून त्यांना मारू नका किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका; तातडीने वन विभागाला माहिती द्या. – हर्षल पारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *