“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांच
.
दसरा मेळाव्यानंतर मुंबईत घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी जोडलेले कथित फोटो, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला 500 कोटींचा गैरव्यवहार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली कथित धमकी आणि आगामी काळातील ‘रेझिम चेंज’ यावर त्यांनी विस्तृत भूमिका मांडली.
अमित शहा हेच गँगचे सूत्रधार; विरोधकांच्या राजकीय हत्यांची भीती!
बॉलिवूडवरील हल्ले आणि लॉरेन्स बिश्नोईच्या जाळ्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. पंजाबमधील सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण असो, मुंबईतील बाबा सिद्दीकींची हत्या असो, अथवा सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांच्या घरावरील हल्ले असोत; प्रत्येक वेळी त्या त्या राज्यांच्या पोलिसांनी बिश्नोईच्या ट्रान्झिट कस्टडीची मागणी केली. मात्र, गुजरातच्या साबरमती तुरुंगातून त्याला कधीही मुंबई किंवा इतर पोलिसांच्या ताब्यात दिले जात नाही. परदेशातून, अगदी म्यानमार आणि युएईमधून गुन्हेगार आणले जातात; मग साबरमतीतून त्याला बाहेर का काढले जात नाही?”
राजकीय नेते टार्गेटवर असल्याचा दावा
“बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्यासाठी दहशत माजवली जात आहे. भविष्यात राजकीय नेत्यांच्या हत्या घडवून आणण्यासाठी या टोळीचा वापर केला जाईल. सत्तेतील फ्रस्ट्रेशनमधून ही यंत्रणा काम करत असून, ही संपूर्ण गँग एकाच छत्राखाली कार्यरत आहे.”
परमवीर सिंग यांच्या पत्रावरून अनिल देशमुखांना अटक, मग शिंदेंना समन्स का नाही?
मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित केलेल्या 500 कोटींच्या मुद्द्यावरून राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. “मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट विचारले की, भाजप नेत्यांकडून 500 कोटी रुपये घेऊन ते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जरांगेंना दिले का? जरांगे हे जबाबदार नेते आहेत, ते कधी खोटे बोलत नाहीत. जर 100 कोटींच्या एका कथित पत्रावरून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावून त्यांना तुरुंगात टाकले गेले, तर 500 कोटींच्या या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी एकनाथ शिंदे यांना ईडीने तात्काळ समन्स का बजावले नाही?”

गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करा
“राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर शांत का बसले आहेत? आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) याप्रकरणी तत्काळ एफआयआर नोंदवून एकनाथ शिंदे यांची चौकशी करावी आणि ते 500 कोटी रुपये कोणाकडून आले, याचा शोध घ्यावा.”
हरदीप पुरींचा एपस्टीनसोबतचा फोटो उघड; ही तर केवळ सुरुवात
अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन प्रकरणाचा संदर्भ देत राऊत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर बोट ठेवले. संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि जेफ्री एपस्टीन यांचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा उल्लेख करत सांगितले की, “अमेरिकेच्या लॉ अँड ज्युडिशिअरी डिपार्टमेंटने अनेक गुप्त फाइल्स उघडल्या आहेत. कधीही एपस्टीनला एकट्यात भेटलो नाही, असा दावा करणारे हरदीप पुरी पार्टी करताना दिसत आहेत. ते नेमका कोणाचा संदेश घेऊन गेले होते? ही केवळ सुरुवात असून आगामी काळात अशा अनेक आंतरराष्ट्रीय फाइल्स उघडल्या जातील.”
सत्तापालट अचानक वेग घेईल
“अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत न जाता थेट मुंबईत आले. केंद्रातील सत्ता खिळखिळी झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हतबल झाले आहेत. भूगर्भातील हालचाली तीव्र झाल्या असून देशामध्ये लवकरच अनपेक्षित सत्तापालट पाहायला मिळेल.”
शिंदेंच्या आड येणाऱ्यांचा नायनाट म्हणजे फडणवीसांना धमकी!
शिंदे गटातील मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबत केलेल्या विधानांचा समाचार घेताना ते म्हणाले, “शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात जो कोणी आडवा येईल, त्याचा नायनाट केला जाईल. हा थेट इशारा कोणाला आहे? हा इशारा भाजप आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मंत्रिमंडळात बसून एकमेकांचे मुडदे पाडण्याची भाषा सुरू आहे.”
फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करा
“मंत्रिमंडळातील या धमकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली पाहिजे. ते स्वतः गृहमंत्री असताना लाचार का बसले आहेत?” असा खोचक सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
—————————————————–
हेही वाचा…
भांडुपमध्ये नगरसेवक निवडून आणायची धमक नाही: त्यांनी अमित शहा-मोदींवर बोलू नये; चित्रा वाघ यांचा राऊत-ठाकरेंवर पलटवार

शिवाजी पार्कवर पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली होती. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना थेट गुंड लॉरेन्स बिश्नोईशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप केला होता. या सर्व आरोपांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी