Headlines

‘ना चिंता, ना भय..नागनाथ महाराज की जय’ जयघोषाने देगाव दुमदुमले:दिवट्यांच्या प्रकाशात पालखी मिरवणूक; हजारो भाविकांची उपस्थिती‎




देगाव (वा.) पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. विजयादशमीच्या मुहूर्तावर श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवट्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. ‘ना चिंता, ना भय, श्री नागनाथ महाराज की जय’ या जयघोषाने देगाव दुमदुमून गेले. मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नारळाचे तोरण, नारळ, पेढे, साखरेची शेरणी, फुलांचे हार आणि लिंबाच्या पानांच्या माळा अर्पण करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिराचा गाभारा आणि श्रींची पालखी विविध फुलांनी सजविण्यात आली होती. मंदिर परिसरासह पालखी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेली पालखी व गणाची मिरवणूक रात्री अकरा ते पहाटे तीनच्या दरम्यान काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर, साकी व अभंगांच्या माध्यमातून ‘हर बोला हर हर’ असा जयघोष करण्यात आला. दिवट्यांच्या प्रकाशात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. यात्रेचे प्रमुख मानकरी शिवशंकर खर्गे महाराज यांच्यात देवाचा संचार झाल्याची भाविकांची श्रद्धा असून, ते गणरूपात मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाऊस-पाणी, राजकीय घडामोडी, रोगराई आदी विषयांवर भाकणूक केली. त्यांच्या भाकणुकींकडे भाविकांचे लक्ष लागले होते. श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेला सर्वपित्री अमावस्येपासून रुद्राभिषेक, महापूजा, हार, मंडवळ, काकण बांधणे तसेच हळद-कुंकू आणि तेल लावण्याच्या धार्मिक विधींनी प्रारंभ झाला होता. मागील आठ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विजयादशमीला पालखी व गणाच्या मिरवणुकीने यात्रेची सांगता झाली. संपूर्ण सोहळ्यात भक्तिभाव, पारंपरिक प्रथा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दिवट्यांच्या प्रकाशात पालखी सोहळा रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेली पालखी व गणाची मिरवणूक पहाटे तीनपर्यंत सुरू होती. पारंपरिक वाद्यांचा गजर, दिवट्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला. ‘ना चिंता, ना भय, श्री नागनाथ महाराज की जय’ या जयघोषात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. साकी आणि अभंगांच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्याने देगाव पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष वेधले. भोलेराम समाधीवर भेटीचा सोहळा… पालखी सोहळ्यादरम्यान भोगावती नदीतीरावरील भोलेराम यांच्या समाधीस्थळी विशेष भेटीचा कार्यक्रम झाला. भोलेराम यांचे वंशज सुहास शमराज आणि महंत श्री नीलकंठगिरीजी महाराज यांची भेट झाली. त्यानंतर खर्गे महाराज गणरूपात मंदिराकडे रवाना झाले. दंडवत घातल्यानंतर संचार शांत झाल्याचे सांगण्यात आले. पुढे खर्गे महाराजांना स्नान घालण्यात आले. मानकऱ्यांच्या वतीने आहेर, दूध आणि चोरभंडारा देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *