Headlines

सोशल मीडियावरून डिलीट केली तरी जनतेला दाखवणारच:शनिवारी मनसे शाखेवर मोदी-अदानींवरील 'फ्रेंडशिप फाइल'चे थेट स्क्रीनिंग -संदीप देशपांडे




“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित संबंधांवर प्रकाश टाकणारी ‘फ्रेंडशिप फाइल’ ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून काढून टाकली असली किंवा शेअर करणाऱ्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल केले जात असले, तरी मनसे ही डॉक्युमेंट्री महाराष्ट्रातील जनतेला दाखवल्याशिवाय राहणार नाही. येत्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मनसे शाखेवरील मोठ्या स्क्रीनवर या डॉक्युमेंट्रीचे जाहीर स्क्रीनिंग करण्यात येईल. ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी खुशाल घ्यावा,” असा थेट आणि आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीवरून सुरू असलेल्या घडामोडी, उद्योग जगतातील एकाधिकारशाहीचे धोके आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मनसे शाखेवर जाहीर स्क्रीनिंग! डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून हटवण्याच्या आणि कारवाईच्या दबावावर बोलताना देशपांडे म्हणाले, “ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून डिलीट होण्याआधी प्रत्येकाने पाहावी, असे आवाहन मनसेने केले होते. मूळ पोस्ट हटवल्यानंतर आता जे लोक ती पुन्हा पोस्ट करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत किंवा पोलीस नोटिसा पाठवत आहेत. या डॉक्युमेंट्रीमध्ये गुन्हा काय आहे? ज्यांना ही फाईल ऑनलाईन पाहता आली नाही, त्यांच्यासाठी येत्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आमच्या शाखेवरील स्क्रीनवर तिचे थेट प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.” आवाज उठवण्यासाठी सत्य माहिती हवी “या डॉक्युमेंट्रीच्या शेवटी जनतेला एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. आवाज उठवला तर बदल कसा घडतो, हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. पण आवाज उठवण्याआधी नेमका विषय काय आहे आणि देशात काय चालले आहे, हे समजून घेण्यासाठी जनतेने ही डॉक्युमेंट्री पाहणे अत्यंत गरजेचे आहे.” एकाधिकारशाहीमुळे देश कोसळण्याचा धोका देशातील उद्योगधंद्यांवर विशिष्ट उद्योग समूहाचे नियंत्रण येत असल्याचा गंभीर इशारा देताना त्यांनी हवाई क्षेत्राचे उदाहरण दिले, “एखाद्या उद्योग समूहाची एकाधिकारशाही निर्माण झाली की त्याचे किती भयंकर परिणाम देशाला भोगावे लागतात, याचे ताजे उदाहरण म्हणजे इंडिगो एअरलाइन्स. इंडिगोच्या अंतर्गत मॅनेजमेंटमध्ये बिघाड झाला, तेव्हा संपूर्ण देशातील विमान वाहतूक ठप्प झाली आणि विमानतळांवर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यापूर्वी जेट एअरवेज, स्पाइसजेट, गोएअर आणि एअर इंडिया अशा 5 ते 6 प्रमुख कंपन्या स्पर्धेत होत्या, तेव्हा अशी वेळ कधी आली नव्हती.” अदानींच्या एकाधिकारशाहीवर प्रश्न “तीच परिस्थिती आज इतर क्षेत्रांत निर्माण केली जात आहे. जर अदानी समूहाला प्रत्येक क्षेत्रात अशीच एकाधिकारशाही दिली आणि उद्या काही कारणाने तो समूह कोसळला, तर संपूर्ण देश आर्थिक संकटात कोसळण्याची भीती निर्माण होईल. म्हणूनच अमेरिका आणि युरोपसारख्या प्रगत देशांमध्ये एकाधिकारशाही रोखण्यासाठी कडक नियम आहेत; तसे नियम भारतातही लागू झाले पाहिजेत.” नवनाथ बन हे बनपावपेक्षा काही वेगळे नाहीत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘मनसेने आधी आपल्या इंजिनची दिशा ठरवावी’ असा टोला लगावला होता, त्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना देशपांडे म्हणाले, “नवनाथ बन हे बनपावपेक्षा वेगळे काही नाहीत. डोक्याला मुंग्या आल्यावर माणूस जसा वागतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. विषयाला धरून न बोलता काहीतरी भलतेच बोलणाऱ्या अशा लोकांना उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नाही.” मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून प्रसिद्धी “मुख्यमंत्र्यांनी टीव्ही चॅनेल्सना सांगितले आहे म्हणून त्यांचे चेहरे दाखवले जात आहेत, बाकी त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. त्यांनी मनसेच्या इंजिनची चिंता सोडून देशातील जनतेला भेडसावणाऱ्या आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे,” असा सणसणीत टोला संदीप देशपांडे यांनी शेवटी लगावला. —————————————————————– हेही वाचा… मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा “मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *