![]()
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, पुण्यात भाजपकडून ‘स्पाय पेन’चा वापर होत असल्याच्या आरोपांवरून त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. ‘ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी होणार’ मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “काल शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मला भेटले. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपची किंवा संभाषणाची पूर्णपणे फॉरेन्सिक चौकशी होईल, असे मी त्यांना आश्वासित केले आहे. अडीच वर्षांनंतर हे संभाषण आत्ताच बाहेर येण्यामागे नेमका हेतू काय आहे आणि कोणाला टार्गेट केले जात आहे, असे अनेक प्रश्न आहेत. मनोज जरांगे, शिवसेनेचे शिष्टमंडळ आणि भाजपनेही या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे फॉरेन्सिक चौकशीतून याचे जे काही सत्य आहे, ते आम्ही बाहेर काढू.” ५०० कोटींच्या आरोपांवरून भाजपची बदनामी होत आहे का, यावर मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले. ‘सुप्रियाताईंनी तो स्पाय पेन मला नक्की पाठवावा’ पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यासाठी ‘स्पाय पेन’चा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनीकेला होता. या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्पाय पेन म्हणजे नेमके काय आणि तो कसा असतो, हे सुप्रियाताईंनी मला जरूर पाठवून द्यावे. म्हणजे तो स्पाय पेन काय असतो आणि नेमके काय चालले आहे, हे मी निश्चितपणे समजून घेईन.” मतदारांचा उत्साह आणि ५७ वर्षांचे शल्य मतदान प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी समाधान व्यक्त केले. “लोकांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसत असून जनरल इलेक्शनसारखा रिस्पॉन्स आहे. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे, त्यामुळे सर्व पदवीधर आणि शिक्षकांनी जास्तीत जास्त मतदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले. नागपूर पदवीधर मतदारसंघाबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “५७ वर्षांपूर्वीची ही जागा गमावली होती, त्याचे एक शल्य होते. माझे वडील सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, ही एक वेगळी आठवण आहे. यावेळेस मात्र सकारात्मक वातावरण दिसत असून योग्य तोच निकाल लागेल.” ——————– हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान: 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, कोण मारणार बाजी? 27 ऑक्टोबरला मतमोजणी
राज्यातील विधान परिषदेच्या बहुचर्चित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) या विभागांमधील एकूण ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित विरुद्ध बंडखोर अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. २७ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सविस्तर वाचा
Source link
अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?:फॉरेन्सिक चौकशीतून सत्य बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, स्पाय पेनवरून सुप्रिया सुळेंना टोला