Headlines

'पोर्टर' ॲपद्वारे पुण्यात ड्रग्जची विक्री उघड:शिरूरमध्ये तिघांना अटक, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त




पुण्यात ‘पोर्टर’ ॲपचा वापर करून ड्रग्जची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 47.60 ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण 29 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला शिरूरमधील न्हावरा फाटा ते बाबूरावनगर रोडवरील शिवसाई लॉनसमोर काही तरुण अमली पदार्थांची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. विशाल मारुती मोरे (वय 20), प्रतीक संतोष लांबे (वय 25) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय 26, तिघेही रा. शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे 47.60 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण 29 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत ‘पोर्टर’ (Porter) या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपचा वापर ड्रग्जच्या ने-आणीसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. तपासात असे उघड झाले आहे की, 3 ते 4 वेळा ‘पोर्टर’ ॲपद्वारे ड्रग्जचा पुरवठा करण्यात आला होता. डिलिव्हरी बॉईजच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहोचवले जात होते. या रॅकेटमध्ये ‘पोर्टर’ कंपनीचे कर्मचारी सहभागी आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. या टोळीने आतापर्यंत 25 ते 30 जणांना ड्रग्जची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी आणि अल्पवयीन मुले ड्रग्जच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ऑनलाईन ॲप्समुळे ड्रग्जची उपलब्धता सोपी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ड्रग्ज पुरवणारा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरूर पोलिसांनी केली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *