Headlines

किनगावात पथसंचलनावर दगडफेक; 7 जण जखमी:जळगावच्या यावल तालुक्यातील घटना




जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचा एका समुदायाने रस्ता अडवल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांना ४ तास समजुतीनंतरही तोडगा न निघाल्याने सौम्य बळाचा वापर करावा लागला. या वेळी जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संघाचे प्रचारक असे ७ जण जखमी झाले. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले असून चोख बंदोबस्तात पथसंचलन पूर्ण केले. विजयादशमीनिमित्त आयोजित हे पथसंचलन सकाळी ७ वाजता एका धार्मिक स्थळासमोरून जात होते. रस्ता अडवणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तेव्हा एका गल्लीतून पुन्हा दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत पोलिस हवालदार पुरुषोत्तम पाटील यांच्या नाकाला दुखापत झाली, तर फौजदार अनिल महाजन, पोलिस हवालदार सुनील पाटील, आरसीबीचे जवान दानिश तांबोळी, प्रसाद गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील आणि संघाचे प्रचारक सौरभ मतेफळकर जखमी झाले. गावात तणाव, फौजफाटा तैनात, बाजारपेठ बंद परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातून मोठा पोलिस ताफा, आरसीबी, होमगार्ड आणि शीघ्र कृती दल तैनात केले आहे. या घटनेमुळे किनगावची बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. यावल पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *