![]()
पैठण येथील जायकवाडी धरणात दुर्मिळ आणि महागडा ‘आहेर’ मासा सुनील कुंढारे या स्थानिक मच्छीमाराच्या गळाला लागला असून, त्याचे वजन तब्बल ३ किलो आहे. वाम माशासारखा लांबट आकार, कातडीवर तयार होणारा विशिष्ट स्राव आणि बाजारात प्रतिकिलो आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळणारा भाव, यामुळे या माशाने संपूर्ण परिसरातील मच्छीमार आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आहेर माशाच्या कातडीवर नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या द्रवाला किंवा स्रावाला मोठे औषधी व आयुर्वेदिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या स्रावापासून मानवी शरीरातील थकवा व शारीरिक कमजोरीवर मात करण्यासाठी विविध औषधे आणि आयुर्वेदिक गोळ्या तयार केल्या जातात. याच औषधी गुणधर्मांमुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात या माशाला मागणी असून त्याची किंमत १० हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या सामान्य मासळीचे दर तिच्या प्रजाती, आकार, उपलब्धता आणि मागणीवर अवलंबून असतात. परंतु, जायकवाडीत सापडलेल्या या आहेर माशाला मिळालेला प्रति किलो १० हजार रुपयांचा भाव विशेष लक्षवेधी आणि ऐतिहासिक ठरत आहे. यासंदर्भात माहिती देताना मच्छीमार संघटनेचे राज्याध्यक्ष बजरंग लिंबोरे यांनी सांगितले की, हा अत्यंत दुर्मिळ मासा जायकवाडीच्या पात्रात आढळून आला आहे. त्याच्या औषधी उपयुक्ततेमुळेच त्याला इतकी मोठी मागणी आणि बाजारभाव मिळत आहे. माशाची उपलब्धता आणि त्याला मिळणारा उच्च भाव लक्षात घेता, सरकारने यावर तातडीने वैज्ञानिक संशोधन सुरू करावे. या माशाच्या औषधी गुणधर्मांबाबत शास्त्रीय संशोधन झाल्यास स्थानिक मच्छीमारांसाठी उत्पन्नाचा एक नवा आणि भक्कम मार्ग खुला होऊ शकतो, असे लिंबोरे यांनी सांगितले. धरणात सापडलेला आहेर मासा. उजनी जलाशयातही आढळला आहेर मासा आहेर माशाची आणि त्याच्या दराची चर्चा यापूर्वी उजनी जलाशयाच्या परिसरातही झाली होती. २०१९ मध्ये उजनी धरणात साडेसहा किलो वजनाचा आहेर मासा आढळून आला होता. त्या वेळी इंदापूरच्या बाजारात या माशाला प्रतिकिलो चार हजार रुपये भाव मिळाला होता. मात्र, आज जायकवाडीत सापडलेल्या ३ किलोच्या माशाला थेट १० हजार रुपये प्रतिकिलोचा विक्रमी भाव मिळाला आहे. दरम्यान, हा मासा दुर्मिळ असून, त्याला मोठी मागणी असल्याचे बजरंग लिंबोरे यांनी यावेळी सांगितले. मत्स्यव्यवसायाच्या उपआयुक्त मधुरिका जाधव यांनी सांगितले की, मत्स्यव्यवसाय विभाग आणि तज्ज्ञांनी माशाच्या नमुन्याची तपासणी केल्यास त्याची प्रजाती, जैविक रचना आणि औषधी म्हणून कसा उपयोग होतो, यावर माहिती घेणार आहोत.
Source link
जायकवाडीत आढळला दुर्मिळ ‘आहेर’ मासा:वाम माशासारखा आकार; कातडीवरील स्रावाला औषधी गुणधर्म