![]()
कर्जत प्रकल्पावरून आणि वृक्षतोडीवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले असून, विकासाला आणि रोजगाराला विरोध करणे हीच विरोधी पक्षाची एकमेव नीती बनली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. ‘हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच’ विरोधकांकडून हा प्रकल्प गुजरातचा असल्याचा नॅरेटिव्ह सेट केला जात असल्याचा दावा फेटाळून लावत चित्रा वाघ म्हणाल्या, “हा प्रकल्प गुजरातचा नाही तर पूर्णपणे महाराष्ट्राचा आहे. यातून महाराष्ट्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच, यातून निर्माण होणारी १२ हजार मेगावॅट वीज फक्त आणि फक्त महाराष्ट्रालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा विकास नकोय का?” असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांना विचारला. कोळशाची बचत आणि पर्यावरणपूरक प्रकल्प हा प्रकल्प प्रदूषणकारी नसल्याचे स्पष्ट करताना वाघ म्हणाल्या, हा कोळशावर चालणारा प्रकल्प नसून पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर आधारित आहे. यामुळे वर्षाला तब्बल ४.६ दशलक्ष टन कोळसा जळण्यापासून वाचणार आहे. म्हणजेच ४० लाख वाहनांमधून जेवढे कार्बन उत्सर्जन होते, तेवढे प्रदूषण या एका प्रकल्पामुळे टळणार आहे.” ‘भीमाशंकरबाबतचा प्रचार निव्वळ धूळफेक’ भीमाशंकर अभयारण्य धोक्यात असल्याच्या दाव्यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. “हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून १६ किलोमीटर आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किलोमीटर लांब आहे. हे सर्व इको-सेन्सेटिव्ह झोनच्या (ESZ) पूर्णपणे बाहेर आहे. सलग १८ महिने वैधानिक प्रक्रिया आणि पर्यावरणीय अभ्यास पूर्ण केल्यानंतरच याला परवानग्या मिळाल्या आहेत,” असे त्या म्हणाल्या. ‘९० हजार नवी झाडे लावणार’ वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, “कंपनीने २३३ हेक्टर जमिनीच्या बदल्यात आधीच २५३ हेक्टर जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे. शिवाय त्या ठिकाणी ९० हजार नवी झाडे लावली जाणार आहेत.” ‘मिठाचा खडा टाकण्याचे राजकारण थांबवा’ शेवटी विरोधकांना इशारा देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “विरोधकांनी महाराष्ट्रातील जनतेची आणि तरुणांची दिशाभूल करणे आता बंद करावे. प्रत्येक चांगल्या प्रकल्पात मिठाचा खडा कालवून महाराष्ट्राचे नुकसान करण्याचे जे गलिच्छ राजकारण सुरू आहे, ते जनता आता खपवून घेणार नाही.” ——————- हेही वाचा.. मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?: कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
तुम्हाला महाराष्ट्राचा विकास आणि तरुणांना रोजगार नकोय का?:कर्जत प्रकल्पावरून चित्रा वाघ यांचा राज ठाकरे, आदित्य ठाकरे अन् रोहित पवारांवर घणाघात