![]()
कुर्मगती कारभार, रोज उशिराने धावणाऱ्या ट्रेन आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य रेल्वेच्या गलथानपणाचा सोमवारी पुन्हा एकदा कळस पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला. दुपारचे दोन वाजले तरी रेल्वे प्रशासनाला हा बिघाड दुरुस्त करता न आल्याने गेल्या पाच तासांपासून मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची धीम्या तसेच जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सकाळपासूनच मध्य रेल्वेमार्गावर लोकल ट्रेन्स आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस एकापाठोपाठ एक ट्रॅकवर उभ्या आहेत. सकाळी 10 वाजता मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक सुरुवातीला ठप्प झाली होती. त्यानंतर कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनला आग लागल्याने ठाणे ते विक्रोळी दरम्यानची संपूर्ण सिग्नल यंत्रणाच बंद पडली. येथील जळालेल्या केबल बदलण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी रात्र उजाडण्याची चिन्हे आहेत. प्रवाशांचे ट्रॅकमधून चालत स्थलांतर सकाळी दहा वाजता कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनमध्ये आग लागल्यानंतर पुढील सर्व सिग्नल एकाच फटक्यात बंद पडले. यामुळे मोटरमनना लोकल ट्रेन जागेवरच थांबवाव्या लागल्या. एक-दोन तास उलटूनही ट्रेन पुढे न सरकल्याने वैतागलेल्या अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत पुढचे स्थानक गाठण्याचा पर्याय निवडला. मेगाब्लॉकच्या कामावर प्रश्नचिन्ह येत्या काही तासांमध्ये सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली तरी आतापर्यंतचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने संध्याकाळी परतीच्या प्रवासात स्थानकांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारीच मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता; मात्र दुसऱ्याच दिवशी असा मोठा बिघाड उद्भवल्याने ‘मेगाब्लॉकच्या काळात रेल्वे प्रशासन नक्की काय करते?’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
Source link
मध्य रेल्वे कोलमडली! कांजूरमार्गमध्ये सिग्नल केबिनला आग:5 तासांपासून वाहतूक ठप्प; रविवारी मेगाब्लॉक घेऊनही सोमवारी मोठा बिघाड