![]()
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुळदास राऊत आणि तीन संचालकांवर पदावरून हटवण्याचे संकट आले आहे. त्यांच्या कार्यकाळाला दहा वर्षे पूर्ण झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू झाली आहे. विभागीय सहनिबंधकांनी (जेडी) १९ मे २०२६ रोजीच त्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता. मात्र, अध्यक्षांसह संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळवली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही स्थगिती उठवली आहे. न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने जेडीला त्यांच्या जुन्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. संचालकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत अध्यक्ष आणि संचालक पदावर राहू शकतील. पुढील वर्षी विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने, या घडामोडींकडे शिक्षक आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Source link
शिक्षक बँकेच्या अध्यक्षांसह 3 संचालकांवर संकट:10 वर्षे पूर्ण झाल्याने उच्च न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला दिलेली स्थगिती उठविली