![]()
छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयावर ‘क्रिप्टो २४ ग्रुप’ या आंतरराष्ट्रीय टोळीने ‘रॅन्समवेअर’ सायबर हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये घुसखोरी करून सर्व ९ मुख्य सर्व्हर हॅक करत अत्यंत संवेदनशील डेटा ‘एन्क्रिप्ट’ (लॉक) केला आहे. डेटा पूर्ववत करण्यासाठी हॅकर्सनी खंडणीची मागणी केली असून, पैसे न दिल्यास संपूर्ण रुग्णालय तसेच रुग्णांची माहिती डार्क वेबवरील ‘टॉर’ साइटवर लीक करण्याची उघड धमकी दिली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाचे आयटी विभागप्रमुख प्रशांत प्रभात पांडे (३६) यांच्या फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास बिलिंग विभागातून ‘एचएमआयएस’ प्रणाली बंद पडल्याचा तातडीचा फोन आला. पांडे यांनी सर्व्हर रूममध्ये जाऊन तपासणी केली असता एचएमआयएस लिंक डाऊन होती आणि सर्व्हरवर ‘Access Denied’ असा मेसेज येत होता. ‘सोफोस’ अँटीव्हायरस लॉग्स तपासले असता सर्व ९ सर्व्हरवर धोक्याचे लाल ठिपके दिसले. याचवेळी संगणकाच्या स्क्रीनवर हॅकर्सचा मेसेज झळकला. त्यात ‘आम्ही क्रिप्टो २४ ग्रुप आहोत. तुमच्या सर्व फाइल्स लॉक करून डेटा चोरला आहे. संपर्क साधण्यासाठी ३ दिवसांची मुदत आहे. ७ दिवसांत प्रतिसाद न दिल्यास सर्व डेटा लीक केला जाईल,’ अशी धमकी देण्यात आली होती. या सायबर हल्ल्यामुळे एचएमआयएस प्रणालीचा डेटा लॉक झाल्याने बिलिंग आणि डेटा ट्रान्सफरची गती मंदावली आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाने तात्काळ केंद्र सरकारच्या ‘सर्ट-इन’ला आणि सातारा पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिस आणि राज्य सायबर सेलकडून कसून तपास सुरू आहे. रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही १८ ऑक्टोबर रोजी हा सायबर हल्ला झाला होता. मात्र, आम्ही आमचे आपत्कालीन नियोजन तात्काळ सक्रिय केले. त्यामुळे एचएमआयएस डेटा लॉक झाला असला तरी, प्रत्यक्ष रुग्णसेवेवर किंवा शस्त्रक्रियांवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिस आयुक्त, सायबर विभाग आणि सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना देण्यात आली आहे. – डॉ. मिलिंद वैष्णव, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य, बजाज रुग्णालय रुग्णालये ‘सॉफ्ट टार्गेट’ रुग्णालयांचा डेटा लॉक केल्यावर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होतो. हॅकर्सना माहिती असते की, अशा आणीबाणीत प्रशासन दबावाखाली येऊन तात्काळ खंडणी देईल. शिवाय, बँकिंग पासवर्ड बदलता येतो, पण रुग्णांचा वैद्यकीय व इन्शुरन्स डेटा बदलता येत नाही. त्यामुळे हा कायमस्वरूपी डेटा ‘डार्क वेब’वर महाग विकला जातो.
Source link
संभाजीनगरात बजाज रुग्णालयावर सायबरहल्ला:9 सर्व्हर हॅक करून खंडणीची मागणी, डार्क वेबच्या ‘टॉर’ वेबसाइटवर माहिती उघड करण्याची धमकी