![]()
ठाणे येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकरांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ठाण्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटावर आरोप करत मीनाक्षी शिंदे यांच्यावर देखील हत्येचा कट रचल्याचा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावरून मंगळवारी ठाण्यात रात्री शिवसेना ठाकरे गटाकडून रास्ता रोको देखील करण्यात आले. यावर आता शिंदे गटाकडून पलटवार करण्यात येत आहे. खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर टीका केली आहे. खासदार नरेश म्हस्के म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची जी हत्या झाली आणि त्यानंतर त्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे विरोधी पक्ष सर्वजण एकत्र येऊन जो प्रयत्न करत आहेत, ठाणे महापालिकेच्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली. सर्वांनी एकत्र येऊन दोन आकडी संख्या सुद्धा विजय प्राप्त करू शकले नाहीत, असे सर्वजण त्या प्रदीप पूर्णेकर यांच्या त्या मृतातम्याचा आधार घेऊन शिवसेनेला जो लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत शिवसेनेच्या मार्फत झालेली हत्या, त्या संदर्भातील वातावरण हे पाहून आम्ही संयमाची भूमिका घेतली. एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्याची दिवशी सीपींना फोन केला आणि जे कोणी हत्यारे असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे, पकडले गेले पाहिजेत आणि पूर्णपणे त्या मृतातम्याला न्याय दिला पाहिजे, कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि एसआयटी नेमली गेली आणि आरोपी पकडले गेले आहेत. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, परंतु त्या घटनेचा आधार घेऊन पहिल्या दिवसापासून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांना जे लक्ष केले जात आहे, काल त्याचा अतिरेक झाला आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. आणि हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. जे आरोपी असतील, तपास तुम्हाला मान्य नसेल, जो काही तपास झाला, पोलिस पोलिसांचे काम करत आहेत. तुमच्या जवळ असलेले जे काही पुरावे आहेत, ते एसआयटीला सादर करा आणि त्यांच्याकडे तपासची मागणी करा. जे कोणी आरोपी असतील त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाहीत. सरनाईक साहेब सुद्धा त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना शब्द दिला होता तसेच एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांचे बोलणे देखील करून दिले होते. तरीपण केवळ कोणाला तरी टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि ठाण्यातला शिवसैनिक शांत बसणार नाही, हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. कुभांड ज्यांनी रचले आहे त्यांना आम्ही सोडणार नाही नरेश म्हस्के म्हणाले, काल जे काही प्रकार झाले, घोडबंदर रस्ता बंद केला गेला, त्याच सोबत नौपाडा शहराच्या मध्यभागी रस्ता बंद केला गेला, नागरिकांना प्रचंड त्रास झाला. लोक प्रतिनिधी म्हणून सर्व लोकांनी आमच्याशी संपर्क साधला, त्यात कामावरून येणारी माणसं असू द्या, अॅम्ब्युलेन्स असू द्या, चार-पाच तास त्यांना अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा सुद्धा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तिथे आमचे शिवसैनिक जाऊन त्यांना विरोध करू शकलो असतो, आजही करू शकतो, परंतु केवळ एक सहानभूती म्हणून आम्ही गप्प बसतोय. परंतु, त्या गप्प बसण्याचा फायदा जर कोण घेणार असतील तर हे पूर्ण कुभांड ज्यांनी रचले आहे त्यांना आम्ही सोडणार नाही आणि शिवसैनिक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. चुकीच्या पद्धतीने वागणार असाल तर ठोशास ठोसा देऊ संपूर्ण महाराष्ट्रातून आज शिवसैनिक निघालेला आहे. कोणीही त्यांना काही सांगण्याची गरज नाही. कारण शिंदे साहेबांचा केलेला अपमान कोणीही आम्ही सहन करणार नाही. जे विरोधी पक्ष त्यांना वाटत आहे की आपण मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांना निवडणुकीत पराभूत करू शकलो नाही, त्या पक्षाला पराभूत करू शकलो नाहीत, परंतु अशा कृतीचा आधार घेऊन एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करू, परंतु कधीच ते यशस्वी होणार नाहीत. चुकीच्या पद्धतीने वागणार असाल तर ठोशास ठोसा देऊ, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले? मंत्री प्रताप सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले, प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या राजकीय विरोधकांनी या सगळ्या गोष्टीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मी नावं घेऊन सांगतो, पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे ठाण्यात आले आणि पूर्णेकर कुटुंबाच्या घरी गेले. जे आरोप होते, त्या आरोपींच्या व्यतिरिक्त एफआयआरमध्ये काही लोकांची नावं टाकायला पोलिसांना परावृत्त केले. तरी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंनी पोलिस आयुक्तांना सूचना केल्या की जे काही पूर्णेकर कुटुंबाचे मत असेल, त्यांच्या काही भावना असतील, त्यांच्या वेदनांशी आम्ही सहमत आहोत परंतु, कुठल्याही प्रकारे जे आरोप केले जात आहेत, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचे काम सुरू पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, फक्त एकच गोष्ट आहे, जी राजकीय परिस्थितीत मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले जात आहे. प्रामुख्याने मी नाव घेतो सर्वप्रथम उबाठाने केले, त्यात भरिस भर म्हणून इतर विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोप केले. या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा दिसत आहे की जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचे. जे आरोपी आहेत, त्यांची चौकशी चालू आहे, पोलिस वेळोवेळी माहिती देत असताना देखील तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या घरासमोर जाऊन तुम्ही आंदोलन करत आहात. काल रात्री जवळपास 8 ते 10 तास रस्ते बंद केले, काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले केले. ठाणे हे सुसंस्कृत लोकांचे शहर आहे, ठाणेकरांनी या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत. फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी हे केले जात असेल तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही. ठाणेकरांना वेठीस धरणार असाल तर हे मान्य नाही प्रताप सरनाईक म्हणाले, तुम्ही हजार लोकं आणता आम्ही लाख लोकं अनू शकत नाही? राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना हेही सांगितले की जे कोणी आरोपी असतील त्यांना भर चौकात फाशी देण्याची भूमिका ही शिवसेनेची आणि प्रताप सरनाईकांची आहे. त्यासाठी तुम्हाला वकिलांची फौज निर्माण करायची असेल आणि त्यासाठी सुद्धा जे काही योगदान लागणार आहे ते योगदान आम्ही देऊ. पूर्णपणे एकनाथ शिंदे आणि शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन आम्ही पूर्णेकरांना दिले आहे. मात्र असे असूनही तुम्ही रात्री बेरात्री ठाणेकरांना वेठीस धरणार असाल तर हे मान्य नाही.
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा पलटवार:'विरोधकांकडून मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न'- खासदार नरेश म्हस्के