![]()
पैठण तालुक्यातील दुष्काळी भागाला ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेमुळे मोठा दिलासा मिळत असला, तरी पावसातील प्रदीर्घ खंड आणि पाण्याच्या वाढत्या गरजेमुळे या भागातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शेतातील पिके वाचविण्यासाठी आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जायकवाडी धरणातून सिंचनासाठी ब्रह्मगव्हाण योजनेच्या माध्यमातून खेर्डा प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते अप्पासाहेब निर्मळ यांनी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना ही या भागासाठी वरदान ठरली आहे. खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी ही योजना मार्गी लावल्याने या भागातील हजारो हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. केवळ सिंचनच नव्हे, तर यामुळे या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे. तालुक्यातील ५५ गावांतील पाणीटंचाई कमी करण्यास या योजनेची मोठी मदत झाली असून, जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. भुमरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील उपसा पंप सुरू झाले आणि काही भागांतील शेतांपर्यंत पाणी पोहोचले. यामुळे पिकांना मोठा आधार मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, आता खेर्डा प्रकल्प कोरडा पडल्यामुळे या प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांसह अप्पासाहेब निर्मळ यांनी केली आहे. सध्या जायकवाडी धरणात ७३.६३ टक्के इतका मुबलक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, धरणातील एकूण पाणीसाठा आणि प्रत्यक्ष सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होणे या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत. पाण्याची आगामी काळातील गरज, बाष्पीभवनामुळे होणारा अपव्यय आणि भविष्यातील पाण्याचे एकूण नियोजन या सर्वांचा समतोल राखून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय आवश्यक आहे. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी निर्मळ यांनी आमदार विलास भुमरे यांच्याकडे केली आहे. पावसामुळे शेतीचे संपूर्ण गणितच बिघडले पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे गणितच बिघडले आहे. अशा बिकट परिस्थितीत ब्रह्मगव्हाण योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणे आणि जायकवाडीतून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे अचूक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या योजनेतील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून पाणीवितरण व्यवस्था सुरळीत केल्यास दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. त्याच अनुषंगाने जायकवाडीचे पाणी त्वरित खेर्डा प्रकल्पात सोडण्यात यावे, असे मत शेतकरी गणेश मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
Source link
खेर्डा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने 55 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर:जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी