![]()
“मतदार यादीतील एसआयआर (SIR) प्रक्रियेत जुन्या व नियमित मतदारांची नावे कोणतीही संधी न देता जाणीवपूर्वक वगळायची आणि पुरावे दिल्यावर त्यांना ‘फॉर्म 6’ भरण्यास भाग पाडायचे, हा निवडणूक आयोगाचा अत्यंत बेकायदेशीर कारभार आहे. फॉर्म 6 हा केवळ नवीन मतदारांसाठी असतो. ‘मी यापूर्वी कधीही मतदार नव्हतो’ असे खोटे डिक्लेरेशन लिहून द्यायला आयोग मतदारांना लावत आहे. उद्या खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा रोखठोक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या मनमानीविरोधात मनसेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी मतदार यादीतील गोंधळ, सर्वोच्च न्यायालयातील याचिका, विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसलेला दणका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीतील पराभव आणि ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणावर आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली. फॉर्म 6चा घोळ सर्वोच्च न्यायालयात; 5 नोव्हेंबरला सुनावणी मतदार यादीतील एसआयआर प्रक्रियेविरुद्ध मनसेने पुकारलेल्या कायदेशीर लढ्याविषयी संदीप देशपांडे म्हणाले, “मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळवी यांचे नाव एसआयआरच्या ड्राफ्ट लिस्टमधून प्रशासनाने जाणीवपूर्वक वगळले. आम्ही जेव्हा वडाळा कार्यालयात कागदपत्रे आणि पुरावे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी थेट ‘फॉर्म 6’ भरा असे सांगितले.” खोटे प्रतिज्ञापत्र देण्याची सक्ती का? “फॉर्म 6 हा पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांसाठी असतो. त्यामध्ये ‘मी यापूर्वी कुठेही मतदार नव्हतो’ असे डिक्लेरेशन असते. जे नागरिक आधीपासून मतदार आहेत, त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र का लिहून द्यावे? उद्या खोटी माहिती दिल्याप्रकरणी मतदारावर कायदेशीर कारवाई झाली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे जुन्या मतदारांवर फॉर्म 6 ची सक्ती करू नये, अशी मुख्य मागणी आम्ही याचिकेत केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाची नोटीस “अॅड. देबाशिष गोडबोले आणि अॅड. हितेश जैन यांच्यामार्फत आम्ही सर्वोच्च न्यायालयात ही याचिका मेन्शन केली. न्यायालयाने याची तात्काळ दखल घेत निवडणूक आयोगाला नोटीस काढली असून, येत्या 5 नोव्हेंबर रोजी यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आई-वडिलांच्या नावाचे मॅपिंग करण्याचे नियम पुढे केले जात आहेत. ज्यांचे आई-वडील लहानपणीच वारले आहेत, त्यांचे मॅपिंग कसे करणार? निवडणूक आयोगाने स्वतःच्या डोक्याने हा सावळा गोंधळ निर्माण केला आहे.” नागपुरात फडणवीसांना, तर वाराणसीत मोदींना फटका विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालांवरून देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्यात 3 पदवीधर मतदारसंघांत महायुतीचा झालेला पराभव हा सुशिक्षित तरुण वर्गाच्या असंतोषाचा स्फोट आहे. जंगलतोड, हुकूमशाही, समाजमाध्यमांवरील खाती ब्लॉक करणे, व्हिडिओ डिलीट करणे या सरकारी मनमानीविरोधात मतदारांनी बॅलेट पेपरवर आपला रोष व्यक्त केला आहे. आमची आधीपासूनच मागणी आहे की निवडणूक ईव्हीएमवर असो वा मतपत्रिकेवर, ती पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे.” मोदी-फडणवीसांनी आत्मपरीक्षण करावे “नागपूर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी आणि संघाचा बालेकिल्ला असूनही तिथे भाजप पराभूत झाला. इतकेच काय, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही भाजपचा पराभव होऊन समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला. मोदी हे स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ आणि देवाने पाठवलेले मानतात, त्यामुळे त्यांना हे पटेल की नाही माहीत नाही; पण त्यांनी आणि भाजपने या पराभवाचे कठोर आत्मपरीक्षण केले पाहिजे.” “पदवीधरांना मतदान करता येत नाही म्हणून इतकी मते बाद झाली, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ती मते खरोखरच बाद झाली होती की जाणीवपूर्वक बाद ठरवली गेली, हा सखोल संशोधनाचा विषय आहे.” ठाणे काय चंद्रावर आहे का? ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या धमकीच्या वक्तव्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “‘कोणी ठाण्यात आले तर परत जाऊ देणार नाही’, अशी धमकी नरेश म्हस्के देतात. ठाणे काय चंद्रावर आहे का? ठाणे महाराष्ट्रातच आहे आणि महाराष्ट्रात कोणाचीही अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्ये करणे सोडून द्यावे.” हत्येचे राजकारण नको “एका राजकीय कार्यकर्त्याची हत्या झाली आहे आणि त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा वेळी त्या दुःखी कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवायची सोडून तिथे शक्तीप्रदर्शन करणे आणि राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी व लाजीरवाणे आहे,” असे संदीप देशपांडे यांनी शेवटी स्पष्ट केले. ————————————————————- हेही वाचा… फडणवीसांवर बोलताना तुमची कुवत आणि औकात काय?: महायुतीत राहून आमचेच पाय तोडणाऱ्या ‘शेखचिल्लीं’ना भाजप भीक घालत नाही; प्रवीण दरेकरांना हल्लाबोल “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र रस्ते, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या योजनांनी वेगाने पुढे जात आहे. मात्र, फडणवीसांविषयी मनात टोकाचा तिरस्कार आणि पोटात मळमळ बाळगून रोज उठून त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांची नेमकी कुवत आणि औकात काय आहे? सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचेच तोंड भाजते. महायुतीत राहायचे, एकाच ताटात जेवायचे आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमचे पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. ज्या फांदीवर बसलात तीच तोडली तर स्वतःचाच कडेलोट होईल, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे. भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही; पण गृहीत धरून सकाळ-संध्याकाळ वार करणार असाल, तर जशास तसे उत्तर द्यायला भाजपही मागे-पुढे पाहणार नाही,” असा आक्रमक आणि संतापजनक इशारा भाजपचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
आधीपासून मतदार असताना 'फॉर्म 6' भरून खोटे प्रतिज्ञापत्र का द्यायचे?:मनसेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस, संदीप देशपांडेंची EC वर टीका