Headlines

सात लेखक आणि प्रकाशनाला इंदिरा अत्रे पुरस्कार जाहीर:गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे आणि संजय ऐलवाड यांचा समावेश




स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे आणि संजय ऐलवाड हे यंदाचे पुरस्कार मानकरी आहेत. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’ आणि प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’ या किशोर-कुमारवयीन तसेच जेन-झी गटासाठीच्या पुस्तकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जातील. आश्लेषा महाजन यांच्या ‘गप्पी गप्पा आणि इतर कथा’ या पुस्तकाला, तसेच ऋषिकेश दाभोळकर आणि हर्षल कोऱ्हाळे यांच्या ‘कुल्फी’ दिवाळी अंक २०२५ ला प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील. अभिषेक जाखडे यांच्या ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि आतील चित्रांसाठी चित्रकार सई देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ आणि संजय ऐलवाड यांच्या ‘झिब्राची गोष्ट’ या पुस्तकांना पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवनाच्या मुख्य सभागृहात होईल. ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. ही माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी दिली. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई अत्रे बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२३ पासून मराठी बालसाहित्यकारांना पुरस्कार देण्याचा मानस डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केला होता. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या उत्तम बालसाहित्यकृतींच्या लेखकांना हे पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन करते, असे प्रसाद भडसावळे यांनी सांगितले. इंदिराबाई शिक्षिका आणि बालसाहित्यिका म्हणून ओळखल्या जात. त्यांनी लेखनातून मुलांना संस्कारक्षमता आणि गुणग्राहकता शिकवली. आजच्या काळातील अशाच कळकळीच्या बालसाहित्यकारांचा सन्मान करणे हा पुरस्काराचा उद्देश आहे, असे डॉ. भारती एम. डी. यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *