Headlines

नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’मधील गुलफाम हसनची भूमिका प्रत्यक्षात उतरवत आहेत का?:‘त्या’ घोषणांना समर्थन आहे का? अमित साटम यांचा सवाल




अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेवरून भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’ चित्रपटातील ‘गुलफाम हसन’ची भूमिका प्रत्यक्षात उतरवत आहेत का, असा सवाल साटम यांनी केला. ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत गुरुवारी (29 ऑक्टोबर) भाजपा मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, राहुल गांधी यांच्यासह काही कलाकारांच्या भूमिकेवरही टीका केली. आमदार अमित साटम म्हणाले की, गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मान-सन्मान आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, देशात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोविडच्या संकटाच्या काळात आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि देशव्यापी लसीकरण मोहिमेमुळे भारताला संकटातून बाहेर पडण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडावी विरोधकांच्या राजकारणावर टीका करताना साटम यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी विरोधक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना साटम यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या कथित वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ‘भारत तेरे तुकडे होंगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह’ आणि ‘अफझल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’ या घोषणांचा उल्लेख केला. या घोषणा नेमक्या कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात आणि या घोषणांना नसीरुद्दीन शाह यांचे समर्थन आहे का, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहन साटम यांनी केले. जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यावरही टीका भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा काही आंतरराष्ट्रीय शक्तींना मान्य नसल्याचा आरोप साटम यांनी केला. देशांतर्गत विरोधक आणि काही भारतविरोधी शक्ती एकत्रितपणे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी जावेद अख्तर, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकांवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबतही टिप्पणी केली. नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन साटम यांनी केले. ‘विकसित भारत 2047’ हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजात शांतता, एकता आणि लोकशाही मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 2 नोव्हेंबरला शिवतीर्थ ते कामगार मैदान पदयात्रा ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथून कामगार मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाप्रती बांधिलकी व्यक्त करण्यात येणार असल्याचे साटम यांनी सांगितले. पदयात्रेच्या समारोपानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याचे भाषण होणार आहे. या अभियानांतर्गत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जिल्हा आणि विधानसभा स्तरावर प्रबुद्ध नागरिक संमेलने तसेच विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करणे, लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवणे आणि नागरिकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे हा या कार्यक्रमांचा उद्देश असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, श्वेता परुळकर, भाजपा मुंबईचे प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम, ॲड. राहुल तिवारी, अजय सिंह आणि किशोर जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हेही वाचा…… ‘मास्टरमाइंडला अटक कधी करणार?’:आदित्य ठाकरेंचा ठाण्यातून सवाल, मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यानंतरही न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाण्यातील एका प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंडला अटक कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मीनाक्षी शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, राजीनामा हा मुख्य मुद्दा नसून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आणि आरोपींना अटक कधी होणार, हे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *