![]()
ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत परस्परांतील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भजन, गायन आणि विविध सा
.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामनाथ बंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बंग मित्र परिवाराच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सादर झालेल्या भजन, गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढून एकत्र आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. या उत्सवाला पाथर्डी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विशाल डहाळे, आरोग्य विभाग निरीक्षक शुभम काळे, पाणीपुरवठा विभाग निरीक्षक दिनेश पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दुधाळ, अजिनाथ डोमकावळे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक जीवन अधिक आनंदी व उत्साही बनविण्यासाठी अशा स्नेहमेळाव्यांची आवश्यकता असल्याचे संघाचे संस्थापक सदस्य भगिरथ उरणकर यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे ज्येष्ठांना आपले अनुभव, विचार आणि आठवणी सांगण्याची संधी मिळते. तसेच सामाजिक संबंध दृढ होऊन ज्येष्ठांच्या अनुभवसंपन्न योगदानाचा सन्मान करण्यास मदत होते, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे उपाध्यक्ष सुभाष भंडारी, दयानंद जिरेसाळ, संजय भोंडे, ॲड. राजेंद्र मंत्री, प्रकाश गुरसाळी, रत्नमाला उदमले, रेखा केळकर, सुभाष रोडी यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्तांनी परिश्रम घेतले. नाना राऊत व पप्पू चौनापूरे यांच्या सौजन्याने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.