Headlines

विधायक उपक्रम:व्यसनांपासून नेहमी दूर राहून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या : डॉ. पाटणकर



देशातील आरोग्यविषयक परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. परदेशातील वैद्यकीय उपचारपद्धती अधिक चांगल्या असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र भारतातही सक्षम वैद्यकीय सुविधा आणि प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्‍यक आहे. तंबाखू, सिगारेट आणि गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन आरोग्य भारती संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी केले. केडगाव येथील सरस्वती विद्यालयात डॉ. केदारनाथ चांडक (सोनई) यांच्या स्मरणार्थ आरोग्य भारती संस्थेच्यावतीने धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात निःस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या चार डॉक्टरांसह योग, सूर्यनमस्कार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्य आठ जणांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सुहास हिरेमठ उपस्थित होते. पुरस्कारातील डॉ. प्रभाकर पवार, डॉ. श्रीवल्लभ घोरपडे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. विजय वऱ्हाडे, शांतीलाल चंदे, रमेश माधवस्वामी व अन्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर पुरकर यांनी केले. डॉ. पाटणकर म्हणाले, सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून हवेच्या प्रदूषणामुळे श्‍वसनविकारांचाही धोका वाढत आहे. हे धोके कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम आणि योगाभ्यासाला दैनंदिन जीवनात महत्त्व दिले पाहिजे. आरोग्यविषयक मार्गदर्शन करत त्यांनी पुरस्कारार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे सुहास हिरेमठ यांनी मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. धन्वंतरी ही आरोग्याची देवता मानली जाते. शरीर, बुद्धी आणि मन या तिन्ही स्तरांवर निरोगी राहणे आवश्‍यक आहे. स्वतःचे आरोग्य जपणे हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे जीवनशैलीत सकारात्मक बदल करून आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जयदीप देशमुख, मुख्याध्यापक संदीप भोर, दादाराम ढवाण, डॉ. अजित फुंदे, श्रीपाद शिंदीकर, राजेश परदेशी आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *