![]()
पुण्यातील रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौक परिसरात तीन जणांनी दिवाळीचे पैसे देण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय महिलेच्या दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला शुक्रवार पेठेतील नेहरू चौक परिसरात राहतात. त्या खरेदीसाठी गोविंद हलवाई चौकात आल्या होत्या. तिथे खरेदीसाठी गर्दी होती. त्यावेळी तिघांनी त्यांना थांबवले. गरजू ज्येष्ठ महिलांना दिवाळीनिमित्त पैसे वाटत असल्याचे सांगून, त्यांनी महिलेला हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तिला बोलण्यात गुंतवून तिच्या हातातील बांगड्या चोरल्या आणि तेथून पळ काढला. चोरटे पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गोविंद हलवाई चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरट्यांचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी धनकवडी परिसरातही पैसे देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला लुटण्यात आले होते. त्यानंतर मुकुंदनगर आणि रविवार पेठेत ज्येष्ठ नागरिकांचे दागिने चोरल्याच्या घटना घडल्या. धान्य किंवा कपडे वाटण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे दागिने चोरण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे आणि ते आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एटीएम कार्डची अदलाबदल करून ५५ हजार रुपये काढले मगरपट्टा चौकातील एटीएम मशीनजवळ कार्डांची अदलाबदल करून खात्यातून ५५ हजार १५० रुपये काढल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपा विनायक वेताळ (वय ५४ रा. कपिल वृंदावन सोसायटी, वानवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा चौक, हडपसर येथील सीडीएम मशीनजवळ हा प्रकार घडला. आरोपीने मागून उभे राहून पिन पाहिला आणि कार्डांची अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादीच्या आईच्या खात्यातून ५५ हजार १५० रुपये काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Source link
दिवाळीचे पैसे देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या बांगड्या चोरी:पुण्यातील रविवार पेठेत 1.5 लाखांचे दागिने लंपास; तीन जणांविरुद्ध गुन्हा