![]()
पाथर्डी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील श्री विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिरात इको फ्रेंडली आकाशकंदील व पणती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतःच्या हातांनी आकर्षक आकाशकंदील आणि पणत्या तयार केल्या. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागद, कार्डशीट, कापडी लेस, दोरा, डिंक व गोंद आदी साहित्याचा वापर करून विविध आकारांचे आकर्षक आकाशकंदील आणि पणत्या साकारल्या. बाजारातील प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंना पर्याय म्हणून स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा वापर करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे, कलाशिक्षक दीपक राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेत तयार केलेले आकाशकंदील व पणत्या दिवाळीत आपल्या घरांमध्ये वापरण्याचा, तसेच बाजारातील प्लास्टिकच्या आकाशकंदिलांना फाटा देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमाचे पालकवर्गातूनही कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. कलाशिक्षक दीपक राठोड यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दीपक राठोड, रत्नमाला सांगळे, सुवर्णा ढाकणे, गार्गी तरवडे, अर्चना धायतडक, शितल आंधळे, अनिता केदार, दादासाहेब उदमले, शशांक महाजन, रेखा गणगे, माधुरी रणदिवे, जयश्री खोरदे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. प्लास्टिकला फाटा देत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश श्री विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांना मिळाली आकाशकंदिलांची माहिती या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. नवीन आकाशकंदील तयार करण्याची माहिती त्यांना मिळाली. स्वत:च्या हाताने तयार केलेला आकाशकंदीलच आता दिवाळीत वापरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. विद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Source link
545 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील:पाथर्डीतील श्री विवेकानंद प्राथमिक विद्यालयात राबवला पर्यावरणपूरक अनोखा उपक्रम