.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ वरील मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकासह यावली येथील चौकात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र,या उड्डाणपुलांच्या बांधकामाचा दर्जासह सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यावली येथील उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीस भेगा पडल्या असून, मोहोळ येथील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीला फुगवटा आल्याने फास्नर मारून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या उड्डाणपुलांच्या टिकाऊपणाबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) लक्षात घेऊन कन्या प्रशाला चौकासह यावली चौकात उड्डाणपूल उभारण्यात आले. या पुलांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन राष्ट्रीय दळणवळण अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अल्पावधीतच पुलांच्या संरक्षण भिंतींना भेगासह फुगवटे दिसू लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिंतीची मजबुती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतींना जोडणारी जाळी अखंड स्वरूपात टाकणे आवश्यक असते. मात्र, संबंधित बांधकामात ही जाळी अखंड न टाकता तुकड्यांमध्ये टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी भिंतीत मुरून दोन्ही बाजूंच्या भिंतींना फुगवटा आला आहे.
सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी खड्डे : यावलीतील उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामालाही भेगा पडल्याचे दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलांच्या बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असताना संबंधित यंत्रणेने तातडीने तांत्रिक तपासणी करणे गरजेचे आहे. पुलांच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, जाळीची रचना, भिंतींची मजबुतीसह पाण्याचा निचरा यांची तज्ज्ञांकडून तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. त्याचबरोबर मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकातील उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. अपघात रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या या पुलामुळे शहराला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गासह सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना हे खड्डे चुकवून मार्गक्रमण करावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
संरक्षक भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला उड्डाणपुलाच्या भिंतीची मजबुती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतींना जोडणारी जाळी टाकली जाते. मात्र, ही जाळी अखंड न टाकता तुकड्यांमध्ये टाकण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी मुरून दोन्ही बाजूंच्या भिंतींना फुगवटा आला आहे.त्यामुळे संबंधित भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. – डॉ. सागर फाटे, मोहोळ