“दिल्लीत विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीच्या नावाने 20 ते 22 पक्षांनी एकत्र येऊन महारॅली काढण्याचा आव आणला, मात्र प्रत्यक्षात या सभेला 20 ते 22,000 लोकही जमवता आले नाहीत. 50,000 क्षमतेच्या मैदानात 50% खुर्च्या अक्षरशः रिकाम्या पडल्या होत्या. ही गर्दी झाकण्
.
राहुल गांधींच्या वरातीत उबाठाला भाषणाची संधीही नाही
दिल्लीतील रॅलीवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटाला घेरताना नवनाथ बन म्हणाले, “दिल्लीत झालेल्या रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सहभागी झाले होते. आम्हाला वाटले होते की महाराष्ट्रातील नेत्यांना बोलू दिले जाईल. मात्र, ना सुप्रिया सुळे यांना संधी मिळाली, ना संजय राऊत यांना! रोज सकाळी उठून राहुल गांधींची हुजरेगिरी करणाऱ्या संजय राऊतांनाही राहुल गांधींनी भाषणाला उभे केले नाही. यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मनात महाराष्ट्राबद्दल असलेला जुना आकस पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.”
सोनिया गांधींनी 2 दिवस ताटकळत ठेवले होते
“यापूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत गेले होते, तेव्हा सोनिया गांधींनी त्यांना 2 दिवस ताटकळत ठेवून साधी भेटही दिली नव्हती. एवढा अपमान सहन करूनही हा गट लाचारीने काँग्रेसची चाकरी का करत आहे?” असा सवाल त्यांनी केला. “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंनी मूळ हिंदुत्वाच्या विचारांवर पुन्हा आणली. ठाकरे गटाने संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला, म्हणूनच जनतेने त्यांना नाकारले. आता त्यांना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणण्याचीही लाज वाटते.”
50% खुर्च्या रिकाम्या, गर्दी दाखवायला AI चे बनावट फोटो
विरोधकांच्या आंदोलनातील गर्दीच्या फुगवलेल्या दाव्यांवर त्यांनी जोरदार प्रहार केला. “ज्या मैदानाची क्षमता 50,000 लोकांची होती, तिथे 50% खुर्च्या रिकाम्या होत्या. 20 ते 22 पक्षांनी मिळून प्रत्येकी 1,000 कार्यकर्तेही आणले नाहीत. 20 ते 25,000 च्या पुढे गर्दी जमवता न आल्याने हे आंदोलन 100% फ्लॉप ठरले आहे.”

विश्वंभर चौधरी, एस. एम. देशमुखांवर निशाणा
“गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांसह विश्वंभर चौधरी आणि एस. एम. देशमुख यांच्यासारख्या मंडळींनी एआय-जनरेटेड खोटे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. राहुल गांधींच्या मूळ रॅलीच्या मैदानाला वर छप्पर होते, पण एआयच्या फेक फोटोमध्ये वर छप्परच गायब होते! तंत्रज्ञानाने तुम्ही बनावट गर्दी दाखवू शकाल, पण लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकत नाही.”
संजय राऊतांना स्पेसशिपमधून आलेली गर्दी दिसली असेल
“संजय राऊत म्हणतात 10 लाख लोक आले होते. रामलीला मैदानावर 10 लाख लोक आणायचे असतील तर एकावर एक 10 मानवी थर लावून दहीहंडी उभारावी लागेल! कदाचित संजय राऊतांच्या भिंगाच्या चष्म्यातून अंतराळातून लोक उतरताना दिसले असावेत. आकडा फुगवणे आणि दलाली करणे हीच त्यांची क्षमता आहे.”
इंडी आघाडीचे 7 दिवसांत 7 चेहरे
पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून विरोधकांची खिल्ली उडवताना ते म्हणाले, “इंडी आघाडीकडे ना नीती आहे, ना नेता. सोमवारी राहुल गांधी पंतप्रधान, मंगळवारी अरविंद केजरीवाल, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी अखिलेश यादव, शुक्रवारी जुम्मा असल्यामुळे उद्धव ठाकरेंना संधी, शनिवारी पुन्हा ममता आणि रविवारी इतर कोणालातरी संधी, अशी यांची अवस्था आहे! शरद पवार आणि उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत. राहुल गांधींच्या नेतृत्वावर यांचा स्वतःचाच विश्वास राहिलेला नाही.”
2029 लाही मोदीच पंतप्रधान
“काल स्वतः राहुल गांधींना कबूल करावे लागले की ‘मोदीजी कहीं नहीं जायेंगे’. देशवासीयांच्या आणि 140 कोटी जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 2029 मध्ये पुन्हा पूर्ण बहुमताने पंतप्रधान होणार आहेत.”
स्वतः जामिनावर बाहेर असणारे मोदींना तुरुंगाची भाषा शिकवतायत!
संजय राऊत आणि काँग्रेसच्या विधानांवर पलटवार करताना बन म्हणाले, “संजय राऊत स्वतः पत्राचाळ घोटाळ्यात जामिनावर बाहेर आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर आहेत. ज्या ज्या वेळी नॅशनल हेराल्डची सुनावणी न्यायालयात असते, त्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधी मोर्चा काढून नौटंकी करतात. आजही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.”
मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही
“पंतप्रधान मोदींनी स्वतःचे घर किंवा ‘मातोश्री 2’ बांधण्यासाठी भ्रष्टाचार केला नाही, पत्राचाळीत गरिबांना लुटले नाही किंवा 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले नाही. ज्यांचे गृहमंत्री तुरुंगात गेले, त्यांनी मोदींवर बोलू नये. चीनच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या ट्रस्टला चीनकडून मिळालेल्या पैशांवर राहुल गांधी आणि संजय राऊत गप्प का? देशातील 140 कोटी जनता या चिनी हस्तकांचा अजेंडा उधळून लावेल.”
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवनाथ बन यांनी स्थानिक घडामोडींवर प्रकाश टाकला. “राम पुर्णेकर हे या प्रकरणात पीडित आहेत. न्याय मागण्यासाठी कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकते. देवेंद्र फडणवीस हे केवळ भाजपचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. या प्रकरणात एसआयटी (SIT) स्थापन झाली असून पोलीस निष्पक्ष तपास करत आहेत. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या भेटीवरून शिवसेनेशी वाद जोडणे चुकीचे आहे.”
“राष्ट्रवादीकडे असणारे अर्थखाते कधी द्यायचे किंवा काय करायचे, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. योग्य वेळी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.”
महायुतीतील वाद आता शांत
“शिवसेना आणि भाजपमधील शाब्दिक वाद आता पूर्णपणे शांत झाला आहे. तिकडून बॉलिंग थांबली आहे आणि इकडून बॅटिंगही थांबली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सभेत सर्व नेत्यांना एकत्र राहण्याचे आवाहन केले असून महायुती पूर्णपणे एकसंध आहे.” ठाण्यातील यशस्वी रॅलीनंतर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ ते कामगार मैदान अशी विराट ‘लोकतंत्र बचाव पदयात्रा’ निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
——————————————————————-
हेही वाचा…
भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये: मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत

भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी