Headlines

पवारांना टाळून राष्ट्रवादीच्या 6 बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं:विलीनीकरणाला थेट विरोध अन् अर्थखात्यावरील दाव्यावरून चर्चेला उधाण




विधान परिषद निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत असंतोषाचा मोठा उद्रेक झाल्याची चर्चा होत असून पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला धक्का देत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीतून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही पूर्णपणे वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या 6 ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीतील या गुप्त बैठकीमुळे अजित पवारांच्या पश्चात पक्षात दोन उभे गट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीचा फोटो समोर येताच राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले असून, महाराष्ट्राच्या सत्तेत आणि महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवारांना वगळून 6 ज्येष्ठ नेते थेट अमित शहांच्या दरबारी! विधानपरिषद निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होते. रविवारी रात्री उशिरा दिल्लीत घडलेल्या घडामोडींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर लगेचच पक्षातील इतर 6 ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याशिवाय ही भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सर्व एकत्र दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. बंद दाराआड काय ठरले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राज्यातील सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी नेत्यांनी अमित शाह यांच्यापुढे ठोस भूमिका मांडली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण केले जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या 6 ज्येष्ठ नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे राष्ट्रवादीचे कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये विलीनीकरण होऊ नये, अशी ठाम भूमिका मांडत याला कडाडून विरोध दर्शवला आहे. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा आग्रह या नेत्यांनी धरला. अर्थखाते राष्ट्रवादीला परत देण्याची मागणी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडील राज्याचे महत्त्वाचे अर्थ व नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे ठेवले आहे. हे अर्थखाते मूळ वाटपानुसार पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच सोपवण्यात यावे, अशी आग्रही मागणी या नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केली. पुणे पदवीधरची जागा सोडल्याने खदखद विधानपरिषद निवडणुकीत पक्षाला भोगाव्या लागलेल्या अपयशाचे खापर थेट विद्यमान नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर फोडले जात असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक आणि हक्काची असलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपला सोडण्यात आली. यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. प्रफुल्ल पटेलांचा ‘आत्मचिंतना’चा सल्ला निकालानंतर लगेचच प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचे आणि नेत्यांनी जमिनीवर लोकांमध्ये जावे, असा जाहीर सल्ला दिला होता. दुसरीकडे, पक्षात प्रवक्त्यांच्या नव्या नियुक्त्या करताना विश्वासात न घेतल्याने छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “पक्षाच्या प्रवक्त्यांची नावे आम्हालाही टीव्ही आणि माध्यमांमधूनच कळतात,” असे म्हणत त्यांनी अंतर्गत मनमानी कारभारावर बोट ठेवले होते. पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनंतर पक्षावर ताबा कोणाचा, यावरून राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे समर्थक, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची मूळ राजकीय फळी, असा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. महायुतीवर काय परिणाम होणार? 6 बड्या नेत्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता केंद्र सरकार आणि भाजपचे शीर्ष नेतृत्व यावर काय तोडगा काढणार, अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार, आणि सुनेत्रा पवार यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ——————————————————— हेही वाचा… 20 पक्षांना मिळून 22,000 माणसंही जमली नाहीत:राहुल गांधींच्या वरातीत नाचायला गेले, पण भाषण करू दिलं नाही, भाजपची इंडिया आघाडीवर सडकून टीका “दिल्लीत विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीच्या नावाने 20 ते 22 पक्षांनी एकत्र येऊन महारॅली काढण्याचा आव आणला, मात्र प्रत्यक्षात या सभेला 20 ते 22,000 लोकही जमवता आले नाहीत. 50,000 क्षमतेच्या मैदानात 50% खुर्च्या अक्षरशः रिकाम्या पडल्या होत्या. ही गर्दी झाकण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी एआय-जनरेटेड खोटे फोटो सोशल मीडियावर पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. राहुल गांधींच्या वरातीत नाचण्यासाठी गेलेल्या उबाठा गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला तिथे भाषणासाठी 2 मिनिटांची साधी संधीही मिळाली नाही. काँग्रेसच्या दावणीला बांधल्या गेलेल्यांनी आम्हाला लोकशाही आणि हिंदुत्व शिकवू नये,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी दिल्लीतील इंडी आघाडीची फ्लॉप रॅली, संजय राऊतांचे दावे, नॅशनल हेराल्ड प्रकरण, पुर्णेकर कुटुंबाची मुख्यमंत्र्यांशी भेट, अर्थखात्याचा तिढा आणि महायुतीतील समन्वयावर भाजपची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *