![]()
जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात ईशा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी ‘कैलाश वाद्यम्’ या पारंपरिक वाद्यसंगीताचे सादरीकरण केले. यावेळी भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात नटलेल्या आदियोगींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांचा निनाद, आदियोगींचे दर्शन आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘श्री मार्तंड देव संस्थान’चे अध्यक्ष ॲड. विश्वास गोविंद पानसे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, “ईशाच्या ‘कैलाश वाद्यम्’च्या माध्यमातून दक्षिण आणि पश्चिम भारताच्या संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळाला. स्वयंसेवकांनी एकत्र येऊन केलेले सादरीकरण विलोभनीय होते.” ‘कैलाश वाद्यम्’ ही कैलास पर्वतावरील शिवतत्त्वाशी संबंधित संगीतपरंपरा असल्याचे ईशा फाउंडेशनकडून सांगण्यात आले. विविध पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून शिवभक्तीचा अनुभव देणे आणि संगीताद्वारे आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे, हा या सादरीकरणामागील उद्देश आहे. महाराष्ट्रातील चार मंदिरांत सादरीकरण महाराष्ट्रात प्रथमच ‘कैलाश वाद्यम्’ हा उपक्रम राबविण्यात आला. २८ ऑक्टोबरला मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सादरीकरण करण्यात आले. पुण्यातील श्री सोमेश्वर मंदिर आणि जेजुरीतील श्री खंडोबा मंदिरातही हा कार्यक्रम झाला. यावेळी आदियोगींची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांना प्रसाद म्हणून रुद्राक्ष आणि विभूतीचे वाटपही करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमधील भाविकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा ईशा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. इच्छुक शिवमंदिरांना हा कार्यक्रम विनामूल्य आयोजित करता येणार असून, त्यासाठी ८३००० ८३१११ या क्रमांकावर किंवा info@shivanga.org या ईमेलवर संपर्क साधता येईल.
Source link
जेजुरीच्या खंडोबा मंदिरात ‘कैलाश वाद्यम्’चे सादरीकरण:ईशा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी वाजवली पारंपरिक वाद्ये; भंडाऱ्याने सजलेल्या आदियोगींची मिरवणूक