Headlines

पार्थ पवारांच्या कार्यशैलीवर बड्या नेत्यांचा आक्षेप?:ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीवारीने दुफळीच्या चर्चांना उधाण, कृषिमंत्री भरणेंसह बडोलेंनी केले खंडन




विधानपरिषद निवडणुकीतील धक्क्यानंतर आणि पक्षांतर्गत फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे. पक्षाचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षातील दिग्गज व ज्येष्ठ नेत्यांनी थेट देशाची राजधानी गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली. सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार या दोघेही नसल्याचे समोर आल्यानंतर, अजित पवारांच्या पश्चात पक्षात उभी फूट पडणार का, या चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. या दिल्लीवारीचे फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षातील नेते आता सारवासारव करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही बैठक दुष्काळ आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी असल्याचे म्हटले, तर आमदार राजकुमार बडोले यांनी पार्थ पवारांवर कोणतीही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत पत्रक काढून ही भेट पूर्वनियोजित आणि सुनेत्रा पवारांच्या संमतीनेच झाल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सुनेत्रा-पार्थ पवारांशिवाय 7 बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं! सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ दाखल झाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि माजी खासदार समीर भुजबळ हे सर्व नेते अमित शहा यांच्या दरबारी एकत्र पोहोचले. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर पक्षावर कोणाचे नियंत्रण असावे, पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावे की स्वतंत्र अस्तित्व टिकवावे आणि पार्थ पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपावर ज्येष्ठ नेत्यांचा रोष, या कारणांमुळे हे नेते दिल्लीत तक्रार घेऊन गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एखादा निर्णय सगळ्यांनाच आवडतो असं नाही; बैठका होतच असतात – दत्तात्रय भरणे ज्येष्ठ नेत्यांच्या या अनपेक्षित दिल्लीवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “आमच्या पक्षात कोअर कमिटीच्या बैठका सातत्याने होत असतात. राजकारणात एखादा निर्णय प्रत्येकालाच आवडेल असे नसते, पण चर्चेतून मनातील गैरसमज दूर होत असतात. मला मिळालेल्या माहितीनुसार, कालची दिल्लीतील बैठक संघटना बळकट करण्यासाठी आणि राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी झाली होती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी कशा सोडवायच्या यावर ही चर्चा होती.” विलीनीकरणावर मौन राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर छेडले असता भरणे म्हणाले, “या विलीनीकरणाच्या विषयाबद्दल मला कोणतीही माहिती नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेतेच यावर योग्य ते उत्तर देऊ शकतील.” पार्थ पवारांवर कोणतीही नाराजी नाही; बैठक नियमित -आमदार राजकुमार बडोले पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांनी नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. “राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट ही पार्थ पवार यांच्या कार्यशैलीविरोधातील तक्रारीसाठी होती, असे मला मुळीच वाटत नाही. पक्षात पार्थ पवारांबद्दल कोणतीही नाराजी नाही.” दादांच्या काळापासून सुरू असलेली परंपरा “दिल्लीत नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला ठाऊक नाही. मात्र, आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावलेली बैठक ही अजितदादांच्या काळापासून दर मंगळवारी सुरू असलेली पक्षाची नियमित आणि नियोजित बैठक आहे,” असा खुलासा त्यांनी केला. सुनेत्रा पवारांच्या सांगण्यावरूनच भेट; राष्ट्रवादीचे अधिकृत स्पष्टीकरण दिल्लीतील भेटीवरून वादळ उठल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पवार यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडत विरोधकांना व माध्यमांना खडे बोल सुनावले. “गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन अंतर्गत वादाचे खोटे कथानक रचले जात आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्याच वेळी, अजितदादांच्या काळातील प्रलंबित प्रश्न आणि राज्याच्या हिताचे विषय मांडण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वतंत्रपणे भेटतील, अशी विनंती सुनेत्रा पवारांनीच केली होती आणि वेळ मागितली होती. त्यामुळे ही भेट सुनेत्रा पवारांच्या आदेशाने व सहमतीनेच झाली आहे.” मतदारसंघातील प्रश्न व महायुती समन्वय “या पूर्वनियोजित बैठकीत नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील विकासकामे आणि महायुतीतील समन्वयावर चर्चा केली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलल्याचा दावा पूर्णपणे तथ्यहीन, कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा आहे.” पक्षाला बदनाम करण्याचा कट “काही अदृश्य शक्ती पक्षांतर्गत मतभेद असल्याचे भासवून महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळ प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली 100% एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे,” असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत परिपत्रकाद्वारे जारी केले आहे. ———————————————————————————————— हेही वाचा… माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *