![]()
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पिंपरीतील शगुन चौक येथे मध्यरात्री पूजा साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री एकच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शगुन चौक परिसरातील दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रहाटणी आणि थेरगाव उपअग्निशमन केंद्रातील जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग विझविताना पाण्याच्या दाबामुळे अग्निशमन दलाच्या पाईपचा फटका बसल्याने दोन जवान किरकोळ जखमी झाले. रहाटणी उपअग्निशमन केंद्राचे प्रणय शिर्के आणि थेरगाव उपअग्निशमन केंद्राचे आदित्य गोडे अशी जखमी जवानांची नावे आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, या घटनेत अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीमध्ये दुकानातील पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुकान पूर्णपणे जळून खाक झाल्याने व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ———— हेही वाचा.. पुण्यात एफडीएची मोठी कारवाई:गायत्री लाडू भांडारचा 1,188 किलो लाडू-बुंदीचा साठा जप्त, 1.73 लाखांचा साठा नष्ट; अन्न परवाना निलंबित
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा बुद्रुक येथील टिळेकर नगरमधील मेसर्स गायत्री लाडू भांडार या मिठाई उत्पादन व साठा केंद्रावर धाड टाकून तब्बल 1 हजार 188 किलो मोतीचूर लाडू आणि बुंदीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त अथवा अपमिश्रित असल्याचा संशय असलेला हा सुमारे 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा साठा प्रशासनाने जागेवरच नष्ट केला. तसेच संबंधित उत्पादनाचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
पिंपरीत शगुन चौकातील पूजा साहित्याच्या दुकानाला भीषण आग:लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी