![]()
महाराष्ट्रातील नामांकित ‘सीओईपी’ महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून, यामुळेच गेल्या काही वर्षांत महाविद्यालयाचा दर्जा आणि रँकिंग घसरल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सीईटी परीक्षेचा डेटा लीक झाल्याची तक्रार करूनही आणि सरकारने याप्रकरणी एसआयटी स्थापन करूनही पुढे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले. या डेटा लीकमागे ‘एज्युस्पार्क’ (Eduspark) नावाच्या कंपनीचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपयांची कामे देण्यात आली असून, या कंपनीने बिहारमध्येही कामे घेतल्याचे रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले. या घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओही समोर आणला. या व्हिडिओमध्ये काही शिक्षकांनी परीक्षांमध्ये कशा प्रकारे गैरप्रकार आणि घोटाळा चालतो, याची सविस्तर माहिती दिली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये नारायण शिंगारे नावाच्या एका शिक्षकाने तर सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा रेट ठरलेला असल्याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. या खळबळजनक खुलाशांमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 2 हजार 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, Eduspark कंपनी केवळ राज्यात नाही तर देशातील अनेक ठिकाणी कामे करत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या काळात पहिल्यांदा काम देण्यात आले आहे. त्यानंतर आजपर्यंत हे काम सुरु आहेच. त्यानंतर चंद्रकांत पाटील, दिपक केसरकर पुन्हा चंद्रकांत पाटील असे मंत्री होते त्यांच्या काळात देखील याच कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कामे देणे सुरु आहे असे रोहित पवार म्हणाले. Eduspark नावाच्या कंपनीला 2 हजार 300 कोटी रुपयांची कामे देण्यात अली आहेत. 2 हजार 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या कंपनीने केला आहे. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षणाची वाट लागली यावेळी शिक्षक नारायण शिंगारे यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की, इंजीनियरिंग कॉलजेमधे एडमिशन घेण्यासाठी CET परीक्षा महत्वाची असते. या परीक्षेत घोटाळा होत आहे. याबाबत मी स्वतः एक स्टिंगऑपरेशन केलं आहे. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षणाची वाट लागली आहे. आम्हाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा पाहिजे. ही व्यक्ती पदावर राहाता कामा नये. ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. ही शिक्षण व्यवस्था किडलेली आहे. हे तात्काळ थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही लढा देखील लढणार आहोत. आम्ही स्थानिक पोलिस ठाण्यात गेलो, त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यानंतर SIT टीमकडे गेलो त्यांनी देखील गुन्हा दाखल करुन घेतला नाही. सीईटीसाठी 25 लाख रुपयांचा रेट ते सांगत असल्याची माहिती देखील शिंगारे यांनी दिली. सीईटी परीक्षेच्या माध्यमातून टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांचा ‘रेट’ ठरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती शिंगारे यांनी सांगितली. या गैरप्रकारामागे सुभेंदू प्रभात नावाचा व्यक्ती असून, तो लखनौमधून या संपूर्ण कारभाराचे सूत्रसंचालन करतो. त्याच्या नावावर एकूण सात कंपन्या असल्या तरी पुण्यात त्याची केवळ एकच संस्था कार्यरत आहे. विशेष म्हणजे, आपला प्रभाव पाडण्यासाठी या व्यक्तीने आपण एका कॅबिनेट मंत्र्याचा भाऊ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Source link
COEP प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा:टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी 25 लाखांचा रेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप