Headlines

मुलांना आंतरिक शक्तीची जाणीव करून द्या:पालकांनी गुणांचे ओझे लादू नये; डॉ. भूषण शुक्ल यांचे मत




पुण्यात डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ दिवाळी अंकाचे लोकार्पण झाले. या वेळी बालमानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी मुलांना त्यांच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देण्याची गरज सांगितली. पालक आणि शिक्षकांनी मुलांना केवळ गुण आणि पैशांच्या मागे लागण्यास प्रवृत्त करू नये, तसेच त्यांच्यावर गुणांचे ओझे लादू नये, असे डॉ. शुक्ल म्हणाले. मुलांमधील सुप्त गुण आणि आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या मानसिक आरोग्याला आणि आनंदाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनने हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. खडकीतील संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर, फाऊंडेशनचे संस्थापक आणि माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे, तसेच अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे उपस्थित होते. बेलराईज इंडस्ट्रीजच्या संचालिका सुप्रिया बडवे, श्री रवळनाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्सचे संस्थापक संचालक एम. एल. चौगुले, लेखिका दीपा देशमुख आणि संस्थेचे सदस्य रियाज पिरजादे यांचीही उपस्थिती होती. डॉ. ज्योत्स्ना पडळकर म्हणाल्या, आधुनिक काळात मुलांचे शारीरिक आरोग्य सुधारले असले, तरी मानसिक आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. मुलांप्रमाणेच पालकांमध्येही मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी पालकांनी आरोग्याबद्दल केवळ पुस्तकी माहिती न घेता स्वतःचे आरोग्य सक्षम ठेवावे, असे त्या म्हणाल्या. मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सक्षम असणे गरजेचे आहे. तणावाच्या काळात संयम राखून स्वतःला सक्षम बनवावे आणि मुलांचे मानसिक स्वास्थ्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सकारात्मक विचार, संवेदनशीलता आणि माणुसकी लेखनातून व्यक्त करण्यासाठी ‘चांगुलपणाची चळवळ’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे शुभांगी मुळे यांनी सांगितले. या दिवाळी अंकातून समाजाचा सकारात्मक, सर्जनशील आणि सर्वसमावेशक प्रवास मांडला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *