![]()
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत आरोप – प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावर केलेल्या आरोपांना आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “आम्ही चव्हाणांच्या विरोधात उघडपणे प्रचार केला. निवडणुकीत घात झाला की अपघात, हा प्रश्न बाजूला ठेवा. तुम्हाला तुमच्याच कर्माची फळे मिळाली.’ असा घणाघाती हल्लाबोल सत्तारांनी केला. पराभवानंतर “घात करणाऱ्यांचाही पुढील काळात घात होईल,’ असा इशारा चव्हाण यांनी दिला होता. यावर पलटवार करताना सत्तार म्हणाले,”एकदा पराभव झाल्यावर तो खुल्या दिलाने स्वीकारला पाहिजे. पुढील ६ वर्षे खूप मोठी आहेत. ‘जैसे कर्म करेगा वैसा फलदेगा भगवान’, हीच गीतेची शिकवण आहे. हजारो मतांनी पराभव का झाला, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. १८ वर्षांच्या कार्यकाळात नेमके काय काम केले, तेही सांगावे.‘दिल को बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है’, असे म्हणत त्यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे. मी लपून छपून नव्हे. मी उघड विरोध केला. मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे ते म्हणाले. सतीश चव्हाणांचा सुनेत्रा पवार यांच्याकडे अहवाल पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पराभवाचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांनी उघडपणे घेतलेली विरोधी भूमिका, शिवसेनेने (शिंदे गट) केलेली कोंडी, अंतर्गत असहकार्याची संपूर्ण माहिती देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. आता हा वाद थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे. त्यामुळे त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत.
Source link
अठरा वर्षांत काय केले ते सतीश चव्हाण यांनी सांगावे:स्वतःच्या कर्मानेच पराभव- सत्तार, दिल को बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है; सत्तारांची टोलेबाजी