![]()
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे झिया खान यांनी विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाशी संबंधित पाच जणांविरुद्ध २५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अबू सालेमच्या कारागृहातील भेटीवरून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्येक प्रतिवादीकडून ५० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. डी. कराडभाजने यांनी पाचही प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, रील्स आणि व्हिडिओ हटवण्याचे आदेश द्यावेत, यापुढे बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यास मनाई करावी आणि जाहीर माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी दाव्यात केली आहे. खान यांच्या दाव्यानुसार, विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान फलक झळकावून त्यांचे अबू सालेमशी संशयास्पद संबंध असल्याचा आणि त्यांनी देशविरोधी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला. हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे खान यांनी न्यायालयात म्हटले आहे. आंदोलनातील फोटो, व्हिडिओ आणि संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने बदनामीचा आवाका वाढल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अमोल ठाकरे, विलास पाटील, शुभम आर्खेल, गजेंद्र ऊर्फ टीकू विज आणि लखन कुरिल यांना या दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. खान यांच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे, अॅड. गौरांग भाके आणि अॅड. चेतन डोंगरे यांनी बाजू मांडली. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकृत पाहणीदरम्यान ८ सप्टेंबर रोजी खान आणि अबू सालेम यांची भेट झाली होती. सालेमने शिक्षेची २५ वर्षे पूर्ण झाल्याचा दावा करून सुटकेची मागणी केली होती. या भेटीनंतर विहिंपने खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अल्पसंख्याक आयोगाच्या अधिकृत पाहणीचा तो भाग होता, असे खान यांचे म्हणणे आहे. सालेमच्या सुटकेला पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. आरोप सिद्ध झाल्यास पदाचा राजीनामा देण्याचे आव्हान त्यांनी दिले होते.
Source link
प्यारे खान यांनी विहिंपच्या पाच जणांविरुद्ध दावा दाखल केला:अबू सालेमच्या भेटीवरून बदनामी केल्याचा आरोप; 250 कोटींची नुकसानभरपाई, पोस्ट हटवण्याची आणि जाहीर माफीची मागणी