![]()
ऊस आंदोलन आणि कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये सुरू असलेल्या राजकीय हस्तक्षेपावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ती सरळ सरळ हुकूमशाही आणि दादागिरी आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कोणालाही दाद देणार नाही,” असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ‘उत्कृष्ट चाललेल्या आर्थिक संस्थांवर कब्जा करण्याचा डाव’ गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, “निवडून आलेल्या लोकांचे अधिकार काढून घ्यायचे आणि आपल्या विचाराची माणसे तिथे बसवायची, हा प्रकार सुरू आहे. अतिशय उत्कृष्टपणे चाललेल्या गोकुळसारख्या आर्थिक संस्थेवर जबरदस्तीने कब्जा करण्याचे काम सुरू आहे. येनकेन प्रकारे सत्ता हातात ठेवण्यासाठी आता गोकुळमध्ये कायदा बदलायची प्रक्रिया सुरू आहे, हे सगळे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. हे लोक सहन करतील की नाही माहीत नाही, पण यावर नक्कीच कोर्टकचेरी होईल.” ‘हुकूमशाहीची लक्षणे स्पष्ट दिसत आहेत’ भाजप आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले, “सत्ता हातात ठेवण्यासाठी निवडणूक यादीतून १३ कोटी लोकांना वगळणे असेल, ईव्हीएम (EVM) चा वापर असेल, किंवा सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या लोकांनी युती सरकारच्या मंत्र्यांना केलेली मारहाण असेल, ही सगळी हुकूमशाहीचीच लक्षणे आहेत.” ‘शेतकरी रस्त्यावर उतरल्यानेच यश मिळाले’ ऊस आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी काल स्वतः या सत्याग्रहात सहभागी झालो होतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको केल्याबरोबर त्याला यश मिळाले, कारण लोकांच्या मनात प्रचंड मोठी चीड आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, २०१७-१८ पासून ऊसाच्या एफआरपी (FRP/MSP) मध्ये वाढ झालेली नाही. महागाई आणि उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, पण शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळत नाहीये. त्याविरुद्ध हे आंदोलन होते.” ‘हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल’ जनतेला संघर्षाचे आवाहन करताना चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत लोक एकजुटीने स्वतः रस्त्यावर उतरून विरोध करत नाहीत आणि सरकारला नमवत नाहीत, तोपर्यंत गोकुळसारख्या सहकारी संस्था असोत किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन असो, सरकार ते दडपून टाकेल. त्यामुळे गोकुळ असो वा इतर कोणताही प्रश्न, लोकांनी आपल्या हक्कासाठी आणि अधिकारांसाठी तीव्र आंदोलन केले नाही, तर हे हुकूमशाही सरकार कुणालाही दाद देणार नाही.” —————– हेही वाचा.. तोडगा नाही तर उद्या कोल्हापूर-सांगली-सातारा बंद, रस्ता-दूध सगळं बंद:4500 चा हप्ता मिळेपर्यंत महामार्ग नाही सोडणार – राजू शेट्टी इशारा
ऊसाला प्रति टन ४५०० रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत महामार्ग सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच, आज जर तोडगा निघाला नाही, तर उद्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये ‘कडकडीत बंद’ पाळण्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link