“कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये ज्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे, त्यांना अध्यक्ष करण्याचा अधिकार लोकशाही आणि सहकारात मिळालाच पाहिजे. अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी 14 सदस्यांचा कोरम लागतो, हा नियम मुळात चुकीचा आणि सदोष आहे. जर पराभूत झालेले 12 सदस्य
.
माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी गोकुळच्या निमित्ताने राज्य सरकारने घेतलेल्या अध्यादेशाच्या निर्णयावर सडकून टीका केली. तसेच हा कायदा केवळ गोकुळपुरता मर्यादित नसून भविष्यात महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी बँका आणि विकास सोसायट्या गिळंकृत करण्याचे हे षडयंत्र असल्याचा इशारा त्यांनी दिला.
कोरमचा नियम दुरुस्त करण्याऐवजी नवाच कायदा कशासाठी?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीतील पेचावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी एकूण 14 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र निवडणुकीत पराभूत झालेले 12 संचालक मुद्दाम गैरहजर राहत असल्याने सभेचा कोरम पूर्ण होत नाही आणि अध्यक्षांची निवड अडकवून ठेवली जात आहे.”
बहुमताचा अधिकार डावलला
“सहकारात आणि लोकशाहीत साध्या बहुमताला महत्त्व असते. संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले होते, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 13चे बहुमत आहे, त्यांना अध्यक्षपदाचा अधिकार मिळालाच पाहिजे. कोरमचा नियम चुकीचा ठरत असेल तर तो दुरुस्त करायला हवा होता. पण ते सोडून सरकारने नवाच कायदा करण्याचा घाट घातला.”

12 अधिक 4चे विकृत गणित
“500 कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थांमध्ये 1 शासकीय अधिकारी आणि 4 स्वीकृत संचालक नेमून त्या चौघांना मतदानाचा अधिकार दिला जात आहे. म्हणजेच महायुतीचे पराभूत 12 आणि हे 4 स्वीकृत मिळून 16 सदस्यांचे संख्याबळ दाखवायचे आणि अनैसर्गिकपणे स्वतःचा अध्यक्ष बसवायचा, हा सत्तेचा निव्वळ आडमार्ग आहे.”
उद्या साखर कारखाने, जिल्हा बँका आणि सोसायट्यांवरही गदा येईल!
हा कायदा सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करणारा ठरेल, असा इशारा देताना ते म्हणाले, “कायदा कधीही एका संस्थेपुरता मर्यादित राहत नाही. आज तुम्ही सांगत आहात की या कायद्यातून साखर कारखाने आणि सहकारी बँका वगळल्या आहेत. पण जिथे भाजपची सत्ता येणार नाही, तिथे या संस्थांचा समावेश करून ४ स्वीकृत सदस्य वाढवायचे आणि सत्ता बळकवायची, ही नवी पद्धत सुरू होईल.”
विकास सोसायट्यांवरही डल्ला मारतील
“उद्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील विकास सोसायट्यांमध्येही बहुमत मिळाले नाही, तर तिथेही सदस्य वाढवून सत्ता बळकावतील. पिढ्यानपिढ्या कष्ट करून महाराष्ट्रात उभी राहिलेली सहकाराची मजबूत व्यवस्था आणि निकोप लोकशाही मोडून काढण्याचे हे महापाप आहे.”
गोकुळ ‘अमूल’च्या घशात घालण्याचा उद्योग?
गोकुळ दूध संघाच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, हे जगजाहीर झाले आहे. देशात ज्या पद्धतीने इतर उद्योगांची मालकी बदलली गेली, ते अनुभव जनतेसमोर आहेत. भाजप आपल्या लाडक्या गुजरातसाठी काय करील, याचा नेम नाही.”
अमूलकडून ताबा घेण्याची भीती
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वैभव असलेला गोकुळ दूध संघ अमूलच्या घशात घालण्यासाठीच हा सारा उद्योग सुरू आहे का, अशी दाट शंका येते. सत्तेत बसलेल्यांना दिल्लीतून निरोप आल्यानंतर ते काहीही बोलू शकत नाहीत, अशी त्यांची लाचार अवस्था झाली आहे. गोकुळच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि सत्ता बळकवण्यासाठी चालवलेला हा खेळ महाराष्ट्राचा स्वाभिमानी शेतकरी कदापि सहन करणार नाही,” असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी शेवटी दिला.
——————————————————-
हेही वाचा…
गोवा-सुरतनंतर उदयपूरच्या मेरियटमध्ये लपवलेत गोकुळचे 12 संचालक: सतेज पाटील म्हणाले- पराभूतांना ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने घुसवण्याचा गलिच्छ डाव

“कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खून करणारा अध्यादेश काढला आहे. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ गोकुळवर डोळा ठेवून हा कायदा बदलण्यात आला. ज्या पराभूत उमेदवारांना साडेचार हजार मतदारांनी धुडकावून लावले, त्यांना आता ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने (बॅकडोअर एंट्री) संचालक करून मताचा अधिकार देणे ही कसली लोकशाही? हा कसलाही डेडलॉक नसून महायुतीकडून थेट लोकशाहीच डेड (Dead) करण्याचा विकृत प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी