![]()
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायपालन व शेळीपालनाची जोड देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व शेतकरी सुविधा केंद्र
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश निंबाळकर, डॉ. अजय ठोके, अण्णासाहेब काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात डॉ. महेश पारखे यांनी गायपालन व शेळीपालन व्यवसायातील आधुनिक पद्धती, जनावरांचे संगोपन, आरोग्य व्यवस्थापन, आहार नियोजन आणि व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नमेंट मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टलविषयी अरविंद मांडे यांनी माहिती दिली, तर सागर कदम यांनी डेअरी व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले.
बदलते हवामान व दुष्काळी परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत गायपालन व शेळीपालन हे शेतीला आर्थिक आधार देणारे पूरक व्यवसाय ठरू शकतात. पशुपालन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करावे, शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि उपलब्ध संधींचा उपयोग करून आर्थिक प्रगती कशी साधावी, याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात लवकरच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या योजनेच्या अनुषंगाने आवश्यक असणारे अनुभव प्रमाणपत्र प्रशिक्षणानंतर उपस्थित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे, निलेश जाधव व केशव ठोंबरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
शेतीला पशुपालनाची जोड देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती व व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.