Headlines

संघर्षाला मिळाले यश, शिर्डी संस्थानचे 488 कामगार सेवेत कायम:कामगारांनी जबाबदारी ओळखून साईभक्तांची सेवा करावी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे




कामगारांनी श्रद्धा आणि सबुरीने केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून विश्वासाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आनंदाचा क्षण तुमच्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या यशात अनेकांचे योगदान आहे. मात्र, आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा, असा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला. शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्याच्या संदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मंत्रालय स्तरावर मंत्री विखे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगार संघटनेच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, नगराध्यक्षा जयश्री थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार उपस्थित होते. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी कामगारांच्या वीस वर्षांच्या लढ्याचा उल्लेख केला. सर्व कामगार विश्वासाने एकत्र राहिले, ही महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हे साध्य होऊ शकले. अनेकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राने तुम्ही यश मिळवले, असे त्यांनी सांगितले. शिर्डीसाठी कोणताही निर्णय घेताना स्वार्थ कधीही मनाला शिवला नाही. तसे संस्कार वाडवडिलांनी केले नाहीत. सामाजिक बांधिलकीने काम करत राहिलो, म्हणून अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत गेली. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायची; मात्र जनतेशी प्रतारणा करायची नाही, हीच भूमिका कामगारांच्या लढ्यातही ठेवली, असे मंत्री विखे यांनी सांगितले. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांच्या आरोपांना आणि टीकेला आता पूर्णविराम मिळाला असून शब्दपूर्तीचा आजचा दिवस आहे, असे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *